राज्यात खर्चाला कात्री लावण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर
मुंबई: वाढता प्रशासकीय खर्च आणि इंधन बचतीच्या उद्देशाने राज्य सरकारने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, राज्य प्रशासनाने खर्चात कपात करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये परदेश दौऱ्यांपासून ते शासकीय कँटीनच्या मेन्यू कार्डपर्यंत मोठे बदल सुचवण्यात आले आहेत.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर अनिवार्य
राज्य सरकारच्या आदेशानुसार, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी आता आठवड्यातून किमान एकदा मेट्रो, लोकल रेल्वे किंवा बस यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे केवळ इंधन बचतच होणार नाही, तर सार्वजनिक वाहतुकीबाबत प्रशासकीय स्तरावर एक सकारात्मक संदेश जाईल. तसेच, अधिकाऱ्यांना कारपुलिंग (एकच वाहन शेअर करणे) आणि शक्य असल्यास इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
डिजिटल बैठका आणि परदेश दौऱ्यांवर निर्बंध
विनाकारण होणारा खर्च टाळण्यासाठी सर्व विभागांना आता शक्य तितक्या बैठका 'डिजिटल' म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहे. तसेच, अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कोणत्याही परदेश दौऱ्याला परवानगी दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कँटीन आणि अंगणवाडीच्या मेन्यूत बदल
सरकारी कार्यालयातील कँटीन, रुग्णालये आणि अंगणवाडी येथील खाद्यपदार्थांच्या मेन्यू कार्डमध्ये आता मोठे बदल होणार आहेत. आरोग्याला महत्त्व देतानाच खाद्यतेलाचा वापर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. इंधन आणि आर्थिक बचतीच्या दृष्टीने स्वयंपाकाच्या पद्धतीतही बदल सुचवण्यात आले आहेत.
मिरवणूक आणि बाईक रॅलींना परवानगी नाही
प्रशासकीय खर्चासोबतच इंधनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय टाळण्यासाठी पोलीस विभागातर्फे आता वाहनांच्या मिरवणुका आणि बाईक रॅलींना परवानगी नाकारली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात इंधन खर्च होते आणि वाहतूक कोंडी देखील निर्माण होते, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांचे मंत्र्यांना काटकसरीचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांना काटकसरीबाबत सूचना दिल्या आहेत. मंत्र्यांनी तात्काळ आपला वाहनताफा अर्ध्यावर आणावा तसेच पदाधिकारी आणि आमदारांचा अनावश्यक लवाजमा टाळावा, असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय, खाजगी असले तरी विदेश दौरे टाळावेत, तसेच विशेष विमान आणि हेलिकॉप्टरचा वापर कमी करण्याचे आवाहनही करण्यात आले. 'मी स्वतः आज बाईक वापरली, मंत्र्यांनीही आठवड्यातून एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरावी,' असे फडणवीस यांनी सांगितले.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिलेल्या वाहनांचाही आढावा घेऊन वाहनसंख्या कमी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जिल्हा आणि विभागीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बोलावण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेण्यावर भर देण्यास सांगितले. होर्डिंग, फ्लेक्स आणि रोषणाईपासून दूर राहण्याच्याही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.