नीट परीक्षेची एनटीएकडून नवीन तारीख जाहीर

नीट परीक्षेची एनटीएकडून नवीन तारीख जाहीर

 


नवी दिल्ली:  नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. २१ जून २०२६ रोजी नीट परीक्षा देशभरात घेतली जाणार आहे. यापूर्वी घेण्यात आलेली नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आली. दरम्यान, परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याने एकूण परीक्षा घेणाऱ्या एनटीए संस्थेच्या कामावरच शंका उपस्थित होत आहे. 

सोशल मीडिया हॅण्डलवरून एनटीएने तारीख जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनुसार, नीट यूजी २०२६ परीक्षा पुन्हा घेण्यासाठी तारीख जाहीर करत आहोत. परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी आणि उमेदवारांना विनंती आहे की, त्यांनी एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवरच विश्वास ठेवावा. 

नीट प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 'गेस पेपर'मध्ये जसेच्या तसे

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. या वर्षी तब्बल २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पण, ३ मे रोजी झालेली परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली. नीट प्रश्नपत्रिकेतील प्रश्न गेस पेपर आणि इतर माध्यमांतून विद्यार्थ्यांना विकले गेल्याचे समोर आले. याबद्दलच्या तक्रारी वाढल्यानंतर याचा तपास केला गेला आणि पेपर फुटल्याचे तपासातून निष्पन्न झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, नीट यूजी २०२६ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच महाराष्ट्रातील काही खासगी क्लासमध्ये मिळाले होते. एका खासगी क्लासने परीक्षेपूर्वी काही दिवस आधी विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेतली होती. त्यात प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जसेच्या तसे होते. 

नव्याने विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागेल का? 

विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. पूर्वीची नोंदणी आणि परीक्षा केंद्रांची निवड कायम ठेवली जाईल.

विद्यार्थ्यांना फी परत भरावी लागेल का? 

विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेली परीक्षा फी परत केली जाणार असून, नव्या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तेवढाच काय तो विद्यार्थ्यांना दिलासा असणार आहे.