बारामतीत ‘भूमी उत्सव २०२६’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग
बारामती : शरयू फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘भूमी उत्सव 2026’ या दोन दिवसीय उन्हाळी प्रदर्शनाला बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, तनिष्का पवार, शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते झाले.
या प्रदर्शनात परिसरातील दोनशेहून अधिक लघुउद्योजकांनी सहभाग नोंदविला. ग्रामीण महिलांना रोजगाराची संधी मिळावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे शर्मिला पवार यांनी सांगितले.
‘आम्ही उद्योगिनी’ संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मीनल मोहाडीकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. “घरात एक स्त्री उद्योगी असेल तर संपूर्ण कुटुंब उद्योगी बनते आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होते,” असे त्यांनी नमूद केले. प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेली विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
माजी नगराध्यक्षा मंगल सराफ, जयश्री सातव, भारती मुथा, पौर्णिमा तावरे, संध्या बोबडे यांच्यासह वनिता बनकर, आरती शेंडगे-गव्हाळे, अल्पा भंडारी, सुनीता शहा, सुवर्णा जोशी, प्रतिभा दाते, माधव जोशी, रोहित काटे, गुरुप्रसाद आगवणे उपस्थित होते. स्वागत मोनिका आगवणे यांनी केले. प्रास्ताविक आनंदी निबंधे व गीता ढोले यांनी केले. वृषाली निकम यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मनाली कोकरे यांनी केले.