पावसाळी अधिवेशनाचं बिगुल वाजलं! २२ जूनपासून होणार सुरु, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

पावसाळी अधिवेशनाचं बिगुल वाजलं! २२ जूनपासून होणार सुरु, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

 


मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला पुढील आठवड्यात २२ जूनपासून सुरुवात होत असून तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात विधान परिषदेच्या नव्या उपसभापतींची निवड केली जाणार आहे.

सध्या सुरू असलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल लागून त्याची अधिसूचना निघाल्यानंतर उपसभापती निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत १३ मे २०२५ रोजी संपली. त्यामुळे सध्या रिक्त असलेले उपसभापती पद हे पावसाळी अधिवेशनात भरले जाणार आहे . विधान परिषदेच्या उपसभापतिपदावर शिवसेनेचा दावा आहे. विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपकडे आहेत. तर विधानसभेचे उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे आहे. त्यामुळे विधान परिषदेचे उपसभापती पद शिवसेनेकडे जाण्याचे निश्चित असून या पदासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव आघाडीवर आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विधानभवनात संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज १० जुलैपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सन २०२६-२७ या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. या मागण्यांवर चर्चा होऊन त्या पहिल्या आठवड्यात मंजूर करण्यात येतील. विधानभवन येथे आयोजित कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

विरोधी पक्षनेत्याविना सातवे अधिवेशन
सध्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत. १५ वी विधानसभा स्थापन झाल्यापासून २२ जुलैपासून सुरू होणारे अधिवेशन हे सातवे अधिवेशन आहे. सलग सात अधिवेशनात विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संपली. तेव्हापासून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. सत्तारूढ पक्षाची भूमिका पाहता या अधिवेशनातही विरोधी पक्षनेता निवडला जाण्याची शक्यता नाही.