बारामतीतील धाडसी तरुणांचे शौर्य; निरा कालव्यात उडी घेतलेल्या तरुणीचे वाचवले प्राण

बारामतीतील धाडसी तरुणांचे शौर्य; निरा कालव्यात उडी घेतलेल्या तरुणीचे वाचवले प्राण

 

बारामती: बारामती येथील क्रीडा संकुल परिसरातील निरा डावा कालव्याच्या वाहत्या पाण्यात तरुणीने उडी मारल्याची घटना रविवारी (दि. ३१ मे) रोजी घडली. या घटनेनंतर येथे उपस्थित असलेल्या काही धाडसी तरुणांनी प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता  पाण्यात उडी घेत तरुणीचे प्राण वाचवले. या घटनेमुळे संबंधित युवकांचे बारामतीत कौतुक करण्यात आले. शिवराज शरद झांबरे व प्रेम अभिजित काळे अशी धाडसी युवकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रीडा संकुलाजवळील निरा डावा कालव्यामध्ये एका तरुणीने पाण्यात उडी घेतली. त्यावेळी शिवराज व प्रेम हे दोघे तेथे उपस्थित होते. त्यांनी कोणतीही भिती न बाळगता तात्काळ कालव्यात उडी घेतली.  पाण्याचा वेग आणि परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी धैर्य दाखवत तरुणीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, विशाल जाधव, संजय घोरपडे तसेच इतर उपस्थित नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तरुणीला सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत मदत मिळाल्याने तिचे प्राण वाचले.

घटनेनंतर परिसरात या युवकांच्या धाडसाची आणि सामाजिक बांधिलकीबद्दल कौतुक करण्यात आले.  संकटाच्या क्षणी क्षणाचाही विलंब न करता दाखविलेल्या तत्परतेमुळे एका कुटुंबावर ओढवणारे मोठे संकट टळले.

दरम्यान बारामतीत निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण झालेले असल्याने एखादी व्यक्ति अजाणतेपणी पाण्यात पडली किंवा एखाद्याचे पाण्यात उडी टाकली तरी त्या व्यक्तिला वाचवणे आता जिकीरीचे झाले आहे. अस्तरीकरणामुळे पाण्याचा वेग वाढला आहे. शिवाय पात्रात झाडे-झुडपे किंवा इतर कसलाही आधार मिळत नाही, त्यामुळे अति वेगाने अशी व्यक्ति वाहत पुढे जाते.