पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; १०४ टँकरद्वारे ९९ गावे, ४२६ वाड्यांतील पावणे दोन लाख नागरिकांना पाणीपुरवठा

पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; १०४ टँकरद्वारे ९९ गावे, ४२६ वाड्यांतील पावणे दोन लाख नागरिकांना पाणीपुरवठा

 


पुणे : पुणे विभागात दिवसेंदिवस वाढत्या उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून सुमारे सव्वा तीन लाख नागरिकांना २०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये २०८ गावे आणि ७७६ वाड्या वस्त्यांचा समावेश असून सर्वाधिक पाणी टंचाई आणि टँकर पुणे जिल्ह्यातच असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १०४ टँकर कार्यरत आहेत. या टँकरद्वारे ९९ गावे आणि ४२६ वाड्यांतील १ लाख ७३ हजार ५२९ नागरिक व २० हजार ३०३ पशुधनाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

विभागात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यात मार्च महिन्यापासून तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअस पेक्षा कमी राहिलेला नाही. वाढत्या उन्हाच्या झळा, बेसुमार पाण्याचा वापर, बाष्पीभवन आणि झपाट्याने खालावणारी पाणी पातळी यामुळे धरणे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषदांकडून गाव, वाड्या वस्त्यांवर पेय जल योजनेची पुरेपूर अंमलबजावणी झाली नसल्याने अद्यापही या वाड्या वस्त्यांवर दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणीटंचाईचा विचार केल्यास प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १०४ टँकर कार्यरत आहेत. या टँकरद्वारे ९९ गावे आणि ४२६ वाड्यांतील १ लाख ७३ हजार ५२९ नागरिक व २० हजार ३०३ पशुधन असा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात ८२ टँकरद्वारे ९५ गावे व २८६ वाड्यांमधील १ लाख २० हजार ४५४ नागरिक आणि ७४ हजार २७७ पशुधन, सोलापूर जिल्ह्यात १५ टँकरद्वारे १४ गावे व ६४ वाड्यांमधील २६ हजार २९६ नागरिक आणि ४६ हजार २४६ पशुधन असा पाणी पुरवठा होत असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली.

हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबद्दल वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान वर्तविले आहे. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष वाढत असून भविष्यात आणखी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १६४ विहिर आणि विंधन विहीर, बोअरवेल ताब्यात घेतले आहेत. यामध्येही पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यात ६२ आणि सातारा जिल्ह्यात १९ खासगी विहिरींची ताबा घेण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.

विभागीय आढावा

जिल्हा == टँकर == गावे == वाड्या == लोकसंख्या == पशुधन
पुणे == ०४ == ९९ == ४२६ == १,७३,५२९ == २०,३०३
सातारा == ८२ == ९५ == २८६ == १,२०,४५४ == ७४,२७७
सोलापूर == १५ == १४ == ६४ == २६,२९६ == ४६,२४६
एकूण == २०१ == २०८ == ७७६ == ३,२०,२७९ == १,४०,८२६