भीमाशंकर मंदिर सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून दिशाभूल? १५ जूनपर्यंत मंदिर न उघडल्यास ग्रामस्थच करणार खुले
देशभरातून लाखो भाविक, पर्यटक आणि निसर्गप्रेमी वर्षभर भीमाशंकर येथे भेट देतात. कोरोनानंतर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथेही भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन २८८.१७ कोटी रुपयांच्या विस्तृत विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार विविध विकासकामे सुरू करण्यात आली असून, या कामांसाठी ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले.
सुरुवातीला मंदिर केवळ तीन महिन्यांसाठी बंद राहील आणि १० एप्रिलपासून दर्शनासाठी खुले होईल, अशी घोषणा प्रशासनाने केली होती. त्यानंतर सभामंडपाचे काम विक्रमी कालावधीत पूर्ण होणार असल्याने त्याची गिनीज बुकमध्ये नोंद होईल, असा दावादेखील करण्यात आला होता. मात्र, एप्रिलनंतर पुन्हा मंदिर सुरू होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ३१ मे रोजी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येईल, असे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे ही माहिती राज्यभरातील भाविकांपर्यंत पोहोचली. रविवारी (३१ मे) पहाटेपासून मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकरकडे दाखल झाले. मात्र, तेथे आल्यानंतर मंदिराला पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचे समजल्याने अनेक भाविकांना तीन किलोमीटर अंतरावरूनच दर्शन न घेता परतावे लागले. भाविकांच्या गर्दीमुळे मंचर-भीमाशंकर मार्गावर दिवसभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर बंद असल्याबाबत माहिती नसलेल्या भाविकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पोलिस प्रशासनाचीही दमछाक झाली.
दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने स्थानिक आदिवासी बांधवांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. फुले, प्रसाद, औषधी वनस्पती, लहान-मोठी दुकाने आणि हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. विकासकामांचा वेग संथ असल्याने मंदिर सुरू होण्यास विलंब होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
"जिल्हा प्रशासन स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता निर्णय घेत आहे. मंदिर सुरू करण्याबाबत दोन-तीन वेळा भाविकांची दिशाभूल झाली आहे. आता १५ जूनपर्यंत मंदिर सुरू झाले नाही, तर १६ जून रोजी ग्रामस्थ स्वतः मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करतील. "
- दत्तात्रय हिले, सरपंच, भीमाशंकर-भोरगिरी.
पाच महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने स्थानिक आदिवासी बांधवांची उपजीविका ठप्प झाली आहे. सुरुवातीपासून विकासकामे संथ गतीने सुरू असल्यामुळे विलंब होत असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे."
-रवींद्र डामसे, स्थानिक ग्रामस्थ."