केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा प्रारंभ

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा प्रारंभ

 


कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या जतन, संवर्धन आणि परिसर विकासासाठी मंजूर केलेल्या १४४५.९७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याचा प्रारंभ आज, शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी करण्यात आला. मंदिर परिसरातील विविध विकासकामांच्या कोनशीलेचे अनावरण करून या भव्य प्रकल्पाची औपचारिक मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, ॲड. आशिष शेलार, संजय सावकारे, मकरंद पाटील, माधुरी मिसाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

अमित शाह यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर रामाचा पार येथे उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या प्रदक्षिणा मार्गासह मुख्य मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी उभारण्यात आलेल्या विकास आराखड्याच्या प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात १४३.९० कोटींच्या कामांना मान्यता

हजार वर्षांहून अधिक इतिहास लाभलेल्या आणि देशातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या श्री अंबाबाई मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य मंत्रिमंडळाने ६ मे २०२५ रोजी या आराखड्यास मंजुरी दिली होती. पहिल्या टप्प्यात १४३.९० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली असून मूळ मंदिराचे जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मंदिरातील विद्युतीकरण, सीसीटीव्ही व्यवस्था आणि प्रकाशयोजनेसाठीही मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली आहेत.

मंदिर परिसरातील ४१ लहान-मोठ्या मंदिरांचे संवर्धन 

या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, माहिती केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह, मल्टिपर्पज हॉल, सुरक्षा व्यवस्था, प्रथमोपचार केंद्र, वाहनतळ, दुकाने, अँफिथिएटर आणि विविध सोयी-सुविधांची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय मंदिर परिसरातील ४१ लहान-मोठ्या मंदिरांचे संवर्धन आणि नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.