कालमर्यादेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना नवीन काम नाही; देवेंद्र फडणवीसांचे बैठकीत आदेश
पायाभूत सुविधा प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री वॉररूमचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. कुठल्याही परिस्थितीत पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे तीन ते साडेतीन वर्षांमध्ये पूर्ण झाले पाहिजेत. निविदा प्रक्रिया राबवताना त्यामध्ये कंत्राटदाराने मागील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लावलेल्या कालावधीच्या निकषाचाही समावेश असावा.
कंत्राटदारांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विलंब केल्यास देशाचे व पर्यायाने राज्याचे नुकसान होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये होणारा विलंब खपवून घेतला जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले. बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील हे पायाभूत सुविधा प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश
धारावीमधील उद्योजकांना स्टेट जीएसटीमधून सवलत मिळण्याबाबत कार्यवाही करावी. धारावी पुनर्विकाससंदर्भात निविदा प्रक्रियेत असलेल्या विषयांबाबत पुन्हा मंत्रिमंडळासमोर येण्याची आवश्यकता नाही, याबाबत यंत्रणेने संबंधित विभागांशी चर्चा करून समन्वयाने मुद्दे सोडवावेत.
ना. म. जोशी मार्ग, नायगाव, वरळी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांना भाडे देऊन सध्या राहत असलेली घरे विनाविलंब ताब्यात घेत तिथे पुनर्विकास सुरू करावा.
ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्प हा विहित असलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावा. यामध्ये पुढील तीन-तीन महिन्यांचे उद्दिष्ट ठेवून काम पूर्णत्वास न्यावे.
गोरेगाव ते मुलुंड दुहेरी बोगदा प्रकल्प जानेवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्यात यावा. वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू मार्गाच्या कामांमध्ये प्रगती करावी.
विरार ते अलिबाग या मल्टी मॉडेल कॉरिडोरच्या प्रगतीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करावी. या मार्गाच्या आजूबाजूला काही क्षेत्र निश्चित करून त्या ठिकाणी शासनाने जमिनीची उपलब्धता करून देत गुंतवणूकदाराकडून त्या क्षेत्रावर विशिष्ट उद्योगाच्या विकासाबाबत पडताळणी करावी.
पुणे रिंग रोडचे काम जलद पूर्ण करा...
मुळा व मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी. पुण्यामध्ये मेट्रोचे जाळे विस्तारात आहे. यासाठी एकीकृत तिकीट व्यवस्था असावी.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने काम करावे. यामधील अडचणी दूर करत छत्रपती संभाजीनगरवासियांना मुबलक पाणीपुरवठा करावा, यात कोणत्याही प्रकारची ह्यगय होता कामा नये, असेही मुख्यमंत्री यावेळी बजावले.