नव्या ‘एक्स्प्रेस वे’च्या दिशेने पाऊल प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात; पुणे-मुंबई प्रवास ९० मिनिटांत
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाला (मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे) समांतर असणाऱ्या नव्या ८-पदरी द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या ‘डीपीआर’ला (सविस्तर प्रकल्प अहवाल) ऑगस्ट २६ पासून सुरुवात होत आहे.त्यामुळे या महत्वकांक्षी प्रकल्पाला गती मिळणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे-मुंबईदरम्यान नवीन द्रुतगती महामार्ग बांधण्याचे निश्चित केले. तीन टप्प्यांत हे काम केले जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. तीन वर्षांत १३० किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग बांधण्याचे उद्दिष्ट प्राधिकरणाने ठेवले आहे. या मार्गावरून दिवसाला तीन लाख वाहने प्रवास करू शकतील. जे आताच्या महामार्गाच्या तुलनेत खूप जास्त असणार आहे. हा मार्ग मुंबईतील अटल सेतूला आणि पुण्याच्या ‘रिंगरोड’ला जोडला जाणार आहे. परिणामी केवळ मुंबई-पुणेच नव्हे, तर मुंबई-बंगळूर हा प्रवासदेखील गतिमान होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या मार्गावर आठ मार्गिका करणार आहे. त्यापैकी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चार आणि पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर चार मार्गिका असणार आहेत. तासाला १५०० वाहने वहन करण्याची प्रत्येक मार्गिकेची क्षमता आहे. म्हणजेच आठ मार्गिकांवरून तासाला १२ हजार वाहने धावू शकतील. दिवसाला किमान पावणेतीन लाख वाहने सहजपणे या मार्गावरून धावू शकतील, असा अंदाज आहे.
कसा असणार मार्ग?
आठ पदरी मार्ग
१३० किलोमीटर लांबी
सुरुवात अटल सेतू - शेवट शिवर
६ ते ८ महिने डीपीआर
३ लाख वाहनाची क्षमता
३ वर्ष कालावधी
१५,000 कोटी एकूण खर्च
मार्गाची वैशिष्ट्ये
मार्ग: नवीन मार्ग असणार. शिवाय तुलनेने वळण कमी, चढ-उतारदेखील कमी असणार
रस्त्याचा आराखडा: अत्याधुनिक आणि नवीन तंत्रज्ञान वापरले जाणार
अपघातांचे प्रमाण कमी: रस्त्यासाठी स्मार्ट डिझाईन असणार
प्रवासाचा वेळ: दीड ते दोन तास
"पुणे-मुंबईदरम्यान आणखी एक द्रुतगती मार्ग होणार आहे. पुणे-बंगळूर ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’चा हा भाग असणार आहे. या मार्गाच्या ‘डीपीआर’ला मंजुरी मिळाली असून, लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल. काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षांत मार्ग तयार करण्याचे उद्दिष्ट आहे."
- संजय कदम, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे