मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत पेरणी न करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत पेरणी न करण्याचे आवाहन

 


मुंबई: नैऋत्य मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले आहे. 

राज्य सरकारने म्हटले आहे की, सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. 

दरम्यान, १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

मुख्यमंत्री म्हणाले कमीत कमी नुकसान होईल, असा सरकारचा प्रयत्न 

"अल निनोचं वर्ष आहे. सरासरी पाऊस जरी ९२ टक्के असला, तरीदेखील दुबार पेरणीचं संकट येऊ नये म्हणून शेतकऱ्यांना मी आवाहन केलेलं आहे. पाऊस कमी असला, तरी कमी कमीत नुकसान होईल, असा प्रयत्न चालला आहे", असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले. ते नागपूरमध्ये बोलत होते. 

दरम्यान, कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. "शेतकऱ्यांनी, आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे", असे म्हटले आहे.