भाजपमधून आयत्यावेळी प्रवेश ते बिनविरोध निवडीत विक्रम काकडे ठरले सरस

भाजपमधून आयत्यावेळी प्रवेश ते बिनविरोध निवडीत विक्रम काकडे ठरले सरस

 


पुणे: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषदेची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मिळली. त्यावर भाजपमधून आयत्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करून विक्रम काकडे यांनी सर्व निष्ठावंतांना डावलून उमेदवारी मिळविली. काकडे यांना उमेदवारी देण्यात पार्थ पवार यांचा हट्ट कामी आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी उमेदवारी माघार घेतली.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी नाट्यमय घडामोडीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार माघार घेतली. त्यामुळे पार्थ पवार यांचा उमेदवारीसाठी हट्ट, शरद पवार यांचा आशीर्वाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्तामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश ते बिनविरोध निवड होणे या नाट्यमय घडामोडीत काकडे सरस ठरले.

महायुतीमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ जागांचे वाटप झाले आहे. त्यात भाजपला ११, शिंदेसेनेला ४, राष्ट्रवादी (अजित पवार)ला २ जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये पुणे आणि रायगडची जागा राष्ट्रवादी (अजित पवार)च्या वाट्याला आली. पुण्यात मात्र उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस झाली. पुणे मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, पार्थ पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार संजय काकडे यांच्यासह काही आमदार उपस्थित होते. बैठकीत माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र आणि खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर माजी खासदार संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे निष्ठावंत सुनील टिंगरे, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी आमदार दिलीप मोहिते, रमेश थोरात, विलास लांडे यांना डावलण्यात आले. त्यामुळे निष्ठावंतांसह पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले. काकडे यांना दिलेल्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. त्यातून पक्षातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पार्थ पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात आली. अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना झालाच नाही

महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडे आली. त्यामुळे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा डमी अर्ज म्हणून तुषार कामटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) अशी होण्याचे चित्र होते. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर चक्रे फिरली. श्रीकांत पाटील यांच्यासह तुषार कामटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कंद यांचे बंड शमले

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला पुण्याची जागा मिळाली असतानाही भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रदीप कंद यांनी भेट घेतली. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटे शिल्लक राहिली असता प्रदीप कंद आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची धाकधुक वाढली होती. पण भाजप आमदार राहुल कुल यांच्या सोबत अखेरची काही मिनिटे बाकी असताना प्रदीप कंद हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला.

अपक्ष उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

अपक्ष उमेदवार रणजीत जरे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. या उमेदवारीसाठी "अर्थ"पूर्ण चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.