'लेक लाडकी'चा आधार योजनेला बारामती उपविभागातून भरभरून प्रतिसाद

'लेक लाडकी'चा आधार योजनेला बारामती उपविभागातून भरभरून प्रतिसाद

 

बारामती: मुलींचा जन्माला प्रोत्साहन, शिक्षणासाठी आर्थिक आधार आणि समाजात मुलीं बाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेल्या 'लेक लाडकी' योजनेला बारामती उपविभागात चांगला प्रतिसाद आहे. या योजनेमुळे शेकडो कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली असून मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सरकारची भक्कम साथ मिळत आहे. 

बारामती उपविभागात बारामती, इंदापूर तालुक्याचा समावेश आहे. बारामती तालुक्यात दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या ११९ पालकांचा समावेश आहे; तर इंदापूर तालुक्यात 137 पालकांनी दोन मुली नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून योजनेचा लाभ घेतला आहे. मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणाच्या विविध टप्प्यापर्यंत आर्थिक मदत देणारी ही योजना ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. 
मुलींच्या शिक्षणाचा खर्च कमी करण्याबरोबरच त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे हा या योजनेमागील सरकारचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन स्वीकारणाऱ्या पालकांनाही या योजनेतून प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे कुटुंब कल्याण आणि मुलींचे संगोपन या दोन्ही उद्दिष्टांना बळ मिळत आहे. अंगणवाडी, महिला व बालविकास विभाग; तसेच स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून योजनेची जनजागृती करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने यांनी दिली आहे. 

योजनेच्या मुख्य अटी: 

१) कुटुंबात दोन मुली 

२) पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी.

खालील प्रमाणे मिळणार आर्थिक लाभ: 

मुलीच्या जन्मानंतर: ५०००

पहिली प्रवेश: ६०००

सहावीत प्रवेश: ७०००

अकरावीत प्रवेश: ८०००

१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर: ७५,०००

"मुलींच्या जन्माला सन्मान, शिक्षणाला पाठबळ आणि स्वावलंबी भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा देणारी ही योजना आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील वाढती लाभार्थी संख्या ही या योजनेवरील नागरिकांचा वाढता विश्वास आहे." 
- अभिमान माने, 
बालविकास प्रकल्प अधिकारी, बारामती.

"मुलींच्या जन्मापासून दोघींच्या शिक्षणाच्या विविध टप्प्यापर्यंत आर्थिक मदत देणारी ही योजना माझ्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरत आहे. "
- सागर बनकर, लाभार्थी.