लाडकी बहीण योजनेतील ८० लाख महिलांच्या अपात्रतेवर सीएम फडणवीसांचे मोठे विधान; विरोधकांना दिले चोख उत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला योजनेतून वगळलेलं नाही. डेटाबेसनुसार आणि निकषात न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या बहिणी योजनेच्या निकषात बसत नाहीत तसेच ज्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा ऐंशी लाख महिलांना वगळण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
"काही दिवसापूर्वी केलेल्या तपासणीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. योजनेतील चार ते पाच लाख लाभार्थ्यांकडे चार चाकी कार असल्याचे उघड झाले आहे. काही पात्र महिलांना यातून वगळे असल्याचे वाटत असेल तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
२ कोटी ४६ लाखांवरून लाभार्थी संख्या थेट १ कोटी ६६ लाखांवर
महिला व बालविकास विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या या योजनेची जेव्हा सुरुवात झाली होती, तेव्हा एकूण लाभार्थी महिलांची संख्या तब्बल २ कोटी ४६ लाख इतकी होती. मात्र, आता ई-केवायसी प्रक्रिया आणि छाननी पूर्ण झाल्यानंतर ८० लाख लाभार्थी महिला थेट अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचा आकडा आता थेट १ कोटी ६६ लाखांवर येऊन पोहोचला आहे.