पर्जन्यमानात सुधारणा! महाराष्ट्रात पावसाला वेग येणार; २३ जूननंतर राज्यभर सर्वदूर पाऊस, आयएमडी चा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागांत मॉन्सूनची वाटचाल मंदावली असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना २३ जूननंतर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अरबी समुद्रावरील मॉन्सूनचे प्रवाह कमकुवत झाल्याने आणि आवश्यक कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव असल्यामुळे पावसाचा वेग मंदावला आहे. मात्र, विषुववृत्तीय भागातून येणारे वारे (क्रॉस इक्वेटोरियल फ्लो) हळूहळू मजबूत होत असून, त्याचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवरील पर्जन्यमानावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, २२ जूनपासून कोकण आणि राज्यातील अंतर्गत भागांमध्ये पावसाची शक्यता वाढणार असून, २३ जूननंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) देखील महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांत आगामी आठवड्यांत पावसाची स्थिती टप्प्याटप्प्याने सुधारण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा कायम असून, मंगळवारपासून (ता. २३) शहरात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी शहरात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवारीही कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज असून, दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशातील काही भागांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम आहे. उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही ठिकाणी कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदविण्यात आले. महाराष्ट्र, मध्य प्रदेशालगतचे भाग, उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि गोवा येथे तापमान सरासरीपेक्षा ३ ते ६ अंशांनी अधिक राहिले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पहिल्या आठवड्यात देशातील बहुतांश भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात ईशान्य भारत आणि कर्नाटकमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तिसऱ्या आठवड्यात किनारी कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य भारतातील काही भाग तसेच ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, चौथ्या आठवड्यात मध्य भारतात पर्जन्यमान वाढेल, तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहू शकतो.
मॉन्सूनच्या या बदलत्या स्थितीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता २३ जूननंतरच्या वातावरणीय घडामोडींवर लागले असून, कोकणासह राज्यातील अनेक भागांना लवकरच पावसाचा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.