दौंड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; एका रात्रीतील पाच दरोड्यांचा पर्दाफाश; आंतरजिल्हा टोळी जेरबंद, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १० जून २०२६ रोजी मध्यरात्री खोरवडी परिसरातील बाबीरनगर, आवदेवस्ती, आवाळेवस्ती आणि खोरवडी येथे चार ठिकाणी, तर श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते. दरोडेखोरांनी नागरिकांना मारहाण करत, हत्यारांचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाइल आणि दुचाकी असा सुमारे ७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी तातडीने विशेष तपास पथके तयार केली. गुन्ह्यांची कार्यपद्धती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान पोलिसांनी गणेश मंगेश काळे (रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), विशाल उर्फ हंबरड्या काळे (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) आणि किशोर रावण भोसले (रा. बाभूळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली. तसेच एका विधिसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. टोळीतील आणखी काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
२० गुन्हे उघडकीस
चौकशीत आरोपींनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दरोड्याच्या ४, जबरी चोरीच्या ६ आणि घरफोडीच्या ५ अशा एकूण १५ गंभीर गुन्ह्यांची, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामुळे एकूण २० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
सराईत गुन्हेगारांचा मोठा रेकॉर्ड
स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या अडीच महिन्यांत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणत सुमारे ९०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारीला मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या पथकाने केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंडचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, माळेगावचे सपोनि कुलदीप संकपाळ, स्था.गु.शा.चे पोसई अभिजित सावंत, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, स्था.गु. शाखेचे पोलिस अंमलदार शिवाजी निकम, असिफ शेख, सचिन घाडगे, किशोर तेलंग, योगेश नागरगोजे, राजू मोमीण, गणेश धनवे, संतोष भापकर, सुभाष राउत, गुरुनाथ गायकवाड, विकास कापरे, सुलतान डांगे, रईस मुलाणी, तुषार चव्हाण, गणेश डेरे आदींचा यामध्ये समावेश होता.