निरंकारी मिशनचा बारामतीमध्ये योग दिन उत्साहात संपन्न
बारामती: सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन आशीर्वादाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संत निरंकारी मिशनच्या बारामती सत्संग भवनासह देशभरातील १५००ठिकाणी योग आणि अध्यात्मिक जागृतीवर आधारित कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी माहिती देताना सांगितले की, संत निरंकारी मिशनच्या वतीने खंडोबानगर येथील सत्संग भवनात योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्रद्धाळू भक्तगण, सेवादल स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सौ. अर्चना महेश चौगुले या अनुभवी योग प्रशिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित योग सत्रात सहभागी झालेल्या सर्वांनी योगाभ्यास करून निरोगी आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला.
सद्गुरु माता जी आपल्या विचारांमध्ये नेहमीच ‘स्वस्थ मन, सहज जीवन’ याचा उल्लेख करत सांगतात की, आपले शरीर हे निरंकार प्रभूची अमूल्य देणगी आहे आणि ते निरोगी ठेवणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. त्यामुळे दीर्घायुष्य, सुदृढ आरोग्य आणि यशस्वी जीवनासाठी योग अत्यंत आवश्यक आहे.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ‘निरोगी जीवनासाठी योग’ अशी होती. या संकल्पनेद्वारे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक संतुलन यांचा समन्वय हाच खऱ्या आरोग्याचा पाया असल्याचा संदेश देण्यात आला. याच भावनेशी सुसंगत राहून संत निरंकारी मिशनने योगाला आत्मजागृती, शिस्त आणि सकारात्मक जीवनदृष्टीचे प्रभावी माध्यम मानत जनजागृतीला प्रोत्साहन दिले.
निश्चितच, संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित हा जनकल्याणकारी उपक्रम समाजामध्ये आरोग्य, जागरूकता आणि सकारात्मक जीवनमूल्यांविषयी प्रेरणा निर्माण करत सर्वांगीण कल्याणाचा संदेश देणारा ठरला आहे.