पुण्यात पाणीबाणी..! घरात नळाला पाणी येईना, टाकी भरायला टँकर मिळेना
पुणे: शहरात दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहर परिसर व उपनगर एनआयबीएम रोड, कोंढवा, हडपसर, वाघोली, लोहगाव, औंध, बोपोडी, पाषाण, बानेर, बालेवाडी, शिवणे, लष्कर, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, नगर रस्ता, धायरी, बिबवेवाडी, वानवडी आणि धनकवडी या भागांतील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे.
महापालिकेचा एक दिवसाआड आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, टँकरची अपुरी
उपलब्धता आणि बंद असणाऱ्या बोअरवेल्स यामुळे हजारो कुटुंबांना पाण्यासाठी
संघर्ष करावा लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अनेक
सोसायट्यांमध्ये पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी नागरिकांना बाटली बंद
पाणी विकत घ्यावे लागत आहेत.
फक्त महापालिकेच्या पुरवठ्यावर अवलंबून
असणाऱ्या मध्यवर्ती भागातील सोसायट्या सध्या पाण्याचे पर्यायी स्रोत
शोधण्यासाठी धावाधाव करत आहेत, तर उपनगरांतील टँकरवर अवलंबून असणाऱ्या
सोसायट्यांनाही टँकर मिळेनासे झाले आहे. शहरभरात वाढलेल्या प्रचंड
मागणीमुळे खासगी टँकरचालकांनी नवीन बुकिंग घेण्यास नकार देणे सुरू केले
आहे.
या टंचाईचा गैरफायदा घेत टँकरचे दर अचानक दुप्पट करण्यात आले असून,
यामुळे सोसायट्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक ठिकाणी
पाण्यासाठी नागरिक उतावीळ झाले असून, पालिका कर्मचारी आणि टँकरचालकांसोबत
वादावादीचे प्रसंग घडत आहेत. यामुळे नागरिकांची मानसिकता आणि शांतता बिघडत
चालली आहे. दुसरीकडे, शहरातील मोठ्या आणि नामांकित टाऊनशिप्सना कसा आणि
कुठून पाणीपुरवठा होतोय, असा आक्षेप घेत सामान्य नागरिकांनी यावर
प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
------
बांधकाम प्रकल्पांमधील पाणी वापरावर बंदीची मागणी
शहरात
एका बाजूला नागरिक पाण्यासाठी तरसत असताना, दुसऱ्या बाजूला नवीन
व्यावसायिक व बांधकाम प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर सुरू
आहे. यावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'जोपर्यंत मान्सून
पूर्णपणे सक्रिय होत नाही, तोपर्यंत बांधकाम प्रकल्पांसाठीच्या पाणीवापरावर
महापालिकेने तातडीने नियंत्रण आणावे किंवा बंदी घालावी,' अशी मागणी आता
गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
विद्यार्थी, नोकरदार आणि महिलांचे हाल
पाणी
नसल्यामुळे शहरातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक सोसायट्यांमध्ये
पाणीपुरवठ्याची सकाळची वेळ बदलल्याने नागरिकांचे संपूर्ण नियोजन कोलमडले
आहे. सकाळी वेळेत पाणी न आल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे,
नोकरदारांना वेळेत कार्यालयात पोहोचणे आणि महिलांना घरातील दैनंदिन कामे
उरकणे कठीण झाले आहे. काही सोसायट्यांना त्यांच्या गरजेच्या तुलनेत कमी
पाणी मिळत आहे. वाढते नागरीकरण आणि भूजल पातळीतील घट यामुळे ही समस्या
अधिकच तीव्र बनली आहे.
-----
पर्याय म्हणून जुन्या बोअरवेल्स ठरतायत 'लाईफलाईन'
टँकरचा
खर्च परवडत नसल्याने कोथरूड, औंध, सिंहगड रस्ता, कात्रज आणि
शिवाजीनगरपर्यंतच्या विविध भागांमधील सोसायट्यांनी आता बंद पडलेल्या जुन्या
बोअरवेल्स पुन्हा सुरू करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. यासाठी सोसायट्या
हजारो रुपये खर्च करत आहेत. यातील अनेक बोअरवेल्स निवासी प्रकल्प पूर्ण
होण्यापूर्वी बिल्डरांनी खोदल्या होत्या. पुढे महापालिकेचा पाणीपुरवठा सुरू
झाल्यावर सोसायट्यांनी त्यांचा वापर बंद केला होता. बोअरवेल्सचे पाणी
बागकाम, साफसफाई आणि शौचालयातील फ्लशिंगसाठी वापरले जाईल, जेणेकरून
महापालिकेचे शुद्ध पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी राखून ठेवता येईल.
२०१७ पूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आणि मध्यवर्ती
पेठांमध्ये बोअरवेल दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. परंतु, पंप दुरुस्त
करणे, पाइपलाइन साफ करणे आणि विद्युत यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी १०,००० ते
१५,००० रुपयांपेक्षा जास्त खर्च येत आहे. पुण्यात कुशल तंत्रज्ञांची
कमतरता असल्याने ग्रामीण भागातून कामगार बोलवावे लागत आहेत.
----
पाणी साठवणुकीची नवी अडचण
अनेक
सोसायट्यांकडे पाण्याची साठवणूक करण्यासाठी केवळ एकच मुख्य टाकी आहे.
त्यामुळे महापालिकेचे पिण्याचे पाणी आणि बोअरवेलचे अशुद्ध पाणी एकत्र न
करता ते वेगळे कसे ठेवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी
सोसायट्यांना आता अतिरिक्त टाक्या बसवाव्या लागत असून प्लंबिंग
नेटवर्कमध्ये बदल करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांचा खर्च आणखी वाढतो आहे.
मात्र, भूजल पातळी आधीच खाली गेल्याने या बोअरवेल्सना नक्की पाणी लागणार
का?, हा मोठा प्रश्न आहे.
------
वाघोलीत भीमा नदीचा बंधारा कोरडा; पुरवठा ठप्प
उपनगरांचा विचार केला तर वाघोली परिसरातील परिस्थिती भयानक आहे. भीमा नदीवरील वढू बुद्रुक येथील बंधारा पूर्णपणे कोरडा पडल्याने या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. हा वाघोलीचा मुख्य जलस्रोत होता. पुरेसा पाऊस पडून हा स्रोत पुन्हा भरत नाही तोपर्यंत रहिवाशांना तीव्र पाणीटंचाई सोसावी लागणार आहे. येथे आधीच अनेक सोसायट्या खासगी टँकरवर अवलंबून होत्या, आता महापालिकेचे पाणीही बंद झाल्यामुळे नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडला आहे.
पुण्यात एक दिवसाआड आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. टँकरचे दर दुप्पट झाल्याने सोसायट्यांचे बजेट कोलमडले असून, नागरिक पिण्यासाठी बाटलीबंद पाणी विकत घेत आहेत. टंचाईवर मात करण्यासाठी अनेक सोसायट्या जुन्या बोअरवेल्स दुरुस्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक सोसायटीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे, टँकरचे पाणी उकळून प्यावे आणि महापालिकेने नवीन बांधकामांना पाणी देणे तात्काळ बंद करावे. -सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी सोसायटी संघटना
-------
आम्ही गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेला नियमितपणे आणि प्रामाणिकपणे सर्व कर भरत आहोत. असे असतानाही आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी चक्क २०-२० रुपयांच्या पाण्याच्या बॉटल्स विकत घ्याव्या लागत आहेत, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते? महापालिकेने ‘एक दिवसाआड पाणी देऊ’ असे जाहीर केले; पण प्रत्यक्षात दोन ताससुद्धा पाणी येत नाही, आणि जे येते ते अत्यंत कमी दाबाने. प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. -‘गेरा ग्रीन्स कॉण्डोमिनियम’ एनआयबीएम रोड येथील सदनिकाधारक
-------आमच्या ६०० फ्लॅट्सच्या सोसायटीत हजारो नागरिक राहतात. आम्ही दरवर्षी नियमित मालमत्ता कर भरतो, तरीही पालिकेच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आम्हाला दरमहा ६ ते ८ लाख रुपये केवळ खासगी टँकरवर खर्च करावे लागत आहेत. एवढा अवाढव्य खर्च करूनही पालिकेकडून दिवसाला फक्त २ टँकर मिळत आहेत. सोसायटीची मोठी लोकसंख्या पाहता पालिकेने तातडीने रोज किमान १० टँकर उपलब्ध करून द्यावेत, ही आमची मागणी आहे. -अरुण कामठे, अध्यक्ष, लेक डिस्ट्रिक गृहनिर्माण सोसायटी