उद्धव ठाकरेंनी बोलविलेल्या बैठकीला चार आमदार अनुपस्थित...; कोणा कोणाचे नाव? ऑपरेशन टायगरची चर्चा...
मुंबई: लोकसभेच्या ६ खासदारांनी अचानक साथ सोडल्यामुळे शिवसेना (यूबीटी) बॅकफूटवर गेल्याची चर्चा असतानाच, आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका मोठ्या भूकंपाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. खासदार फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा ठाकरेंच्या आमदारांकडे आणि मुंबई-ठाण्यातील वजनदार माजी नगरसेवकांकडे वळवल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिंदेंच्या या 'ऑपरेशन टायगर'ला वेळीच सुरुंग लावण्यासाठी आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत ठाकरेंनी १६ आमदारांना एकत्र आणत आपल्या गोटात अजूनही 'ऑल इज वेल' असल्याचा संदेश दिल्ली आणि मुंबईतील सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
संसदेत ठाकरे गटाला खिंडार पाडल्यानंतर महायुतीचे नेते आता विधानसभेतही ठाकरेंना एकटे पाडण्याच्या तयारीत आहेत. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर आपले आमदार फुटू नयेत आणि सभागृहात त्यांनी आक्रमक राहावे, यासाठी उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला विधानसभेच्या २० पैकी १६ आमदारांनी आणि विधान परिषदेच्या सर्व ५ आमदारांनी हजेरी लावत उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.
प्रमुख नेते: भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, नितीन देशमुख, सुनील राऊत, कैलास पाटील.
युवा फळी: वरुण सरदेसाई यांच्यासह बाळा नर, प्रवीण स्वामी, गजानन लवटे, हारून खान, मनोज जमसुतकर, बाबाजी काळे, सिद्धार्थ खरात आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल.
विधान परिषदेची पूर्ण साथ: पक्ष फुटीच्या काळातही निष्ठा राखणारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर आणि ज. मो. अभ्यंकर हे पाचही आमदार या बैठकीला उपस्थित होते.
खासदार फुटीमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे, हे नाकारता येणार नाही. आमदारांची ही बैठक म्हणजे केवळ पावसाळी अधिवेशनाची तयारी नसून, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी केलेले 'शक्तीप्रदर्शन' आहे. मात्र, अनुपस्थित राहिलेल्या ४ आमदारांपैकी कोणी आगामी काळात 'वर्षा' बंगल्याची वाट धरतो की 'मातोश्री'वरच ठाम राहतो, यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरेल.