आजपासून ‘पावसाळी वारे’; आराेप-प्रत्याराेपांच्या ‘सरी’; विराेधकांचा चहापानावर बहिष्कार

आजपासून ‘पावसाळी वारे’; आराेप-प्रत्याराेपांच्या ‘सरी’; विराेधकांचा चहापानावर बहिष्कार

 


मुंबई: आमचा प्रयत्न संवादाचा आहे, विरोधकांनी संवाद ठेवला तर चर्चेतून सर्व गोष्टींची उत्तरे द्यायला तयार आहोत, पण राजकराण केले तर राजकीय उत्तर मिळेल, समाजकारण केले तर सामाजिक उत्तर मिळेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत सरकारवर निशाणा साधला. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी कंत्राटामध्ये ५६ टक्के कमिशन, शेतकरी कर्जमाफी यासह विरोधकांच्या सर्व प्रश्नांना पत्रकार परिषदेत उत्तर दिले. 

चहापानावर बहिष्कार न घालता विरोधक चर्चेला आले असते तर काही गोष्टींवर चर्चा झाली असती, काही विचारविनिमय झाला असती. पण विरोधकांनी लोकांचे मुद्देच अवगत नाहीत, अशी टीका सत्ताधाऱ्यांनी केली. त्यामुळे या अधिवेशनात कंत्राटातील कमिशन, शेतकरी कर्जमाफी, राज्यातील संभाव्य दुष्काळ या विषयांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सामना पहायला मिळू शकेल.

आम्ही अर्धवट ऑपरेशन करत नाही : एकनाथ शिंदे

आम्ही अर्धवट ऑपरेशन करत नाही, पूर्ण करतो. याचा अनुभव तुम्हाला आहे. थोडे थांबा लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेच्या खासदारदांच्या ऑपरेशन टायगरचे काय झाले या प्रश्नावर बोलताना दिले. तर ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी अगदी सदृढ आहे, असा मिश्किल टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

...तर राजीनामा देणार नाही तर काय करणार

वर्धापनदिन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुखपद सोडण्याबाबत केलेल्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओसाड गावाची पाटीलकी मी सोडतो असे म्हणणे कितपत योग्य आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ही वेळ का आली? कोण राहिलेच नाही तर राजीनामा देणार नाही तर काय करणार, असा टोला शिंदेंनी लगावला.

मी काल एक मीम पाहिला, त्यात राज ठाकरे शांतपणे झोपले आहेत, त्यावर लिहले आहे की, मला शांतपणे झोप लागते, माझ्याकडे आमदारही नाही खासदारही नाही कोणी जाण्याचा प्रश्नच नाही, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंना लगावला.