अभिजीत दीपकेंची बेरोजगारीवरून काँग्रेसवर टीका, ‘काँग्रेस अपयशी ठरली म्हणूनच जनतेकडून भाजपाला संधी
नागपूर: भारताचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती सुर्य कांत यांनी देशातील तरुणांना झुरळांची उपमा दिली होती. आणि अभिजीत दीपके यांनी कॉक्रोच पार्टीची स्थापना केली. हे नाव सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. लोक त्यावर रील्स बनवत आहेत, जोक्स करत आहेत, मीम्स शेअर करत आहेत, तर काही जण टीकाही करत आहेत. कॉक्रोच पार्टीची स्थापना झाल्यापासून अभिजीत दिपके आपल्या भाषणांमधून केंद्रातील भाजप सरकार आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लक्ष करीत आहेत. भाजपच्या विविध धोरणावर करताना मात्र नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवरही सडकून टीका केली.
काय म्हणाले दीपके?
जयपूरमध्ये झालेला हल्ला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थन करणाऱ्या तरुणांनी केला होता, असा आरोप काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केला. ज्या तरुणांना पोलिसांना पकडले त्यांच्या समाज माध्यमांवरील खात्यात ते संघाचे स्वयंसेवक असल्याचे स्पष्ट असल्याचेही दीपके म्हणाले. नागपूरमध्ये काॅक्रोच पार्टीच्या आंदोलनासाठी आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माझ्यावर झालेला हल्ला हा वाढत्या बेरोजगारीचे कारण आहे. त्यांना थोडे पैसे देऊन त्यांच्याकडून असे कामे करून घेतले जाते. त्यांना नोकरी असती तर त्यांनी कधीही असा प्रकार केला नसता. बेरोजगारीसाठी काँग्रेसही जबाबदार आहे. पण आज सत्ता भाजपची असल्याने आम्ही त्यांनाच प्रश्न विचारणार. काँग्रेसने चुका केल्या म्हणूनच भाजपला लोकांनी सत्तेत बसवले. परंतु, त्यांच्याकडूनही निराशाच झाली, असेही दीपके म्हणाले.
देशात फक्त भाजपच राष्ट्रप्रेमी आहे का?
कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाला नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या आंदोलनाशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे विरोधकांना अभिजीत दिपके यांनी उत्तर दिलं. आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे भारताला १९४७ मध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यासाठी मोठे आंदोलन उभे झाले होते आणि लोकशाहीचे सरकार स्थापन झाले. लोकशाही व्यवस्था टिकवायची असेल तर आंदोलन होणे आवश्यक आहे असेही दीपके म्हणाले. आम्ही आंदोलन करतो याचा संबंध नेपाळ किंवा श्रीलंका येथील आंदोलनाशी जोडण्याचे काहीही कारण नाही. भाजपचीच लोक केवळ राष्ट्रप्रेमी आणि इतर सर्व राष्ट्रद्रोही कशी होऊ शकतात असा प्रश्नही केला.
राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही
परीक्षांमध्ये होणारे घोटाळे, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि जबाबदारीची उणीव यामुळे देशातील तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजनीमा न दिल्यास देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये शांततामय मार्गांनी आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही राजीनामा न दिल्यास येत्या २० जून रोजी दिल्लीत संपूर्ण देशभरातील विद्यार्थी एकत्र येऊन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागितला जाणार आहे. राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असेही दीपके म्हणाले.