विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; महावितरणच्या निष्काळजीपणाचा आरोप, दौंडच्या केडगावात तणाव
स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या मते, संबंधित ठिकाणी वीजवाहिनीची तार सुमारे एक महिन्यापासून जमिनीवर कोसळलेली होती. याबाबत महावितरणला वारंवार दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष माहिती देण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच निष्काळजीपणामुळे यश जगताप याचा बळी गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
घटनेनंतर मृत यश जगताप यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने केडगाव पोलीस चौकीसमोर जमा झाले. संबंधित महावितरण अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पोलीस चौकी परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक नागरिक, मान्यवर आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. संबंधित मागण्यांबाबत प्रशासनाकडून योग्य कारवाईचे आश्वासन देण्यात आल्यानंतर जमाव शांत झाला. दरम्यान, मेहनती व मनमिळावू स्वभावामुळे यश जगताप हा परिसरात परिचित होता. त्याच्या अकाली निधनामुळे धुमळीचा मळा तसेच संपूर्ण केडगाव परिसरावर शोककळा पसरली असून अनेकांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे एका तरुण शेतकऱ्याचा जीव गेल्याने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.