“कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर विचार केला जाईल”, सुनेत्रा पवारांचा मोठा इशारा

“कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर विचार केला जाईल”, सुनेत्रा पवारांचा मोठा इशारा

 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा आज (११ जून) मुंबईत वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत भाष्य केलं. मात्र, भाषणाला सुरूवात करताच सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या आठवणीने भावुक झाल्या. ‘आज अजित पवार आपल्यात नाहीत’, असं म्हणत सुनेत्रा पवार यांना भाषणादरम्यान गहिवरून आलं होतं. पुढे बोलताना सुनेत्रा पवार यांनी सूचक इशारा दिला. ‘आजपर्यंत सर्वांना समजून घेतलं, पण यापुढे कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असल्यास विचार केला जाईल’, असं भाष्य सुनेत्रा पवार यांनी केलं आहे.

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

“आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा २७ वा वर्धापन दिन साजरा करत असताना एक वेगळ्या भावना आणि भावनिक वातावरणात आहोत. आपल्या सगळ्यांचे नेते अजितदादा आज आपल्यात नाहीत. त्यांच्याशिवाय होणारा हा पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन आहे”, असं म्हणत सुनेत्रा पवार भाषणादरम्यान भावुक झाल्या.

“यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आपल्याला सर्वांनाच लाभलेला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष पुढील वाटचाल करत आहे. अजित पवार यांना जो महाराष्ट्र अपेक्षित होता, तसा महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा मला विश्वास आहे”, असंही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या आहेत.

“शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची राष्ट्रवादीची विचारधारा पुढे घेऊन जाणं याचाच अर्थ सर्वांना बरोबर घेऊन जाणं आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल, येथील प्रत्येक तळागाळातील प्रत्येक घटकांनी यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे”, असंही सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे.

“आजच्या आपल्या वर्धापन दिनाची जी थीम ठरवली होती, ती थीम म्हणजे समर्पन, संघर्ष आणि संकल्प. ही संकल्पना आणि यंदाचा वर्धापन दिन अजितदादांना समर्पित केलेला आहे. अजित पवारांनी पक्षाच्या बळकटीसाठी गेले अनेक वर्ष पूर्णपणे स्वत:ला समर्पित केलं होतं. त्यामुळे आपण सुरुवातीलाच अजितदादांसाठी ही समर्पनाची भूमिका घेतली आहे”, असंही सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे.

‘अजितदादा आपल्यात नसले तरी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील’

“शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. अजित पवार यांच्या कामाची पद्धत कोणालाही नवीन नव्हती. अजित पवार यांनी राज्याच्या प्रगतीसाठी सातत्याने संघर्ष केला. शेतकरी, युवक, महिला, उद्योजक, वंचित घटक अशा सर्वांना न्याय मिळावा, यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न केले. अजित पवारांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिलं. त्यांनी लोकहितासाठी काम केलं. अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार नेहमी मार्गदर्शक ठरतील. राष्ट्रवादीला बळकटी देऊन पुढे नेण्याचा दादांचा संकल्प असायचा. त्यांचा हाच संकल्प आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे”, असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे.

‘हीच आपल्या पक्षाची सर्वात मोठी ताकद’

“अजित पवार यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. हे वास्तव आहे. मात्र, अजित पवार यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग आणि सर्वसामान्य माणसांसाठी त्यांची बांधिलकी हीच आपल्या पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे. यावर माझा विश्वास आहे. अजित पवार यांच्या पाश्चात राष्ट्रवादी पक्ष माझ्या पाठीशी एक कुटुंब म्हणून उभा राहिला, याची मला जाणीव आणि अभिमान देखील आहे. याची जबाबदारी किती मोठी आहे हे देखील मला माहिती आहे”, असंही त्या म्हणाल्या आहेत.

“तीन वर्षांपूर्वीच अजित पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. त्यांना अवघ्या अडीच वर्षांचाच कालवधी मिळाला. हा कालावधी मर्यादित असला तरी त्यांनी पक्षाला राष्ट्रीय स्थरावर ओळख मिळवून दिली. अजित पवार यांची ओळख फक्त राजकारणी किंवा समाजकारणी म्हणून नव्हती तर सर्वसामान्यांसाठी आपल्या जीवाभावाचा माणूस अशी होती”, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

“…तर विचार केला जाईल”, सुनेत्रा पवारांचा मोठा इशारा

“योग्यवेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल याची खात्री मी देते. आतापर्यंत पक्षात जे घडलं, त्याबाबत प्रत्येकवेळी मी सर्वांना समजून आणि सावरून घेतलं. अजित पवार यांनी त्यांच्या हयातीत सर्व कार्यकर्त्यांना खूप समजून घेतलं. सर्वांचे हट्ट पुरवले, प्रेम केलं, मानसन्मान केला, पदे दिली. अजित पवार यांनी त्यांच्या प्रयत्नाने सर्वकाही देण्याचा प्रयत्न केला. यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईल. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असेल तर नक्की विचार केला जाईल. अजित पवार ज्या प्रमाणे पक्ष हितासाठी कठोर निर्णय घेत होते, त्या प्रमाणे खरं तर माझ्या स्वभावाप्रमाणे ते मला जड जाईल. मात्र, न्याय देण्यासाठी अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्याबरोबर कायम असतील असा मला विश्वास आहे”, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी सूचक इशारा दिला.