एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमात डावलल्याचे मंत्रिमंडळात पडसाद; आधीच चौकशीचे आदेश, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
गुरुवार, ११ जून, २०२६
Edit
मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांना गेल्या आठवड्यात नवी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी आमंत्रित न केल्याचे पडसाद मंगळवारी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. शिंदेसेनेच्या काही मंत्र्यांनी
याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र, या प्रकरणी आपण आधीच चौकशीचे आदेश
दिलेले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, त्या कार्यक्रमाला मी गेलो तेव्हाच एकनाथ शिंदे का आलेले नाहीत याची विचारणा केली. तेव्हा त्यांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचे लक्षात आले. मी लगेच माझ्या कार्यालयाला फोन केला आणि याबाबत विचारणा केली. तसेच, अदानी समूहाच्या विमानतळ व्यवस्थापनाला आणि सिडकोला कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सांगितले. त्यांच्याकडून तातडीने उत्तर घेतले जाईल आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल. एवढेच नव्हे तर पुढे कोणत्याही कार्यक्रमाबाबत अशी चूक होता कामा नये, अशी सक्त सूचना मी प्रशासनाला दिली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले.
केवळ शिंदे यांनाच नाही तर राजशिष्टाचार म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही अशा शासकीय समारंभांसाठी आमंत्रित केलेच पाहिजे, असे आपण स्पष्ट शब्दांत बजावले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
शिंदेसेनेचे
संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आदी मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना नवी
मुंबईतील कार्यक्रमात डावलण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री
कार्यालयावर आमचा आक्षेप नाही; पण ज्या अधिकाऱ्यांवर आणि कार्यालयांवर
शिंदे यांना आमंत्रित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, त्यांच्यावर
कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी या मंत्र्यांनी केली.