मान्सूनवर एल निनोचे सावट! केरळमध्ये पावसाची ३३ टक्के घट; देशातील शेती क्षेत्रावर काय होणार परिणाम?
भारतीय हवामान विभागाच्या संचालक व्ही. के. मिनी यांनी सांगितले की, राज्यातील केवळ चार जिल्ह्यांमध्ये तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथानामथिट्टा आणि त्रिशूर आतापर्यंत सामान्य पाऊस झाला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस न आल्यास, हे जिल्हेदेखील कमी पावसाच्या श्रेणीत येऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, ज्यावेळी एखाद्या जिल्ह्यातील पावसाची तूट १९ टक्क्यांपेक्षा जास्त असते, तेव्हा त्या जिल्ह्याचे वर्गीकरण 'पावसाची कमतरता असलेला जिल्हा' म्हणून केले जाते. सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे.
शेतीवर मोठा परिणाम
पावसाच्या कमतरतेमुळे शेतीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. सामान्यपेक्षा कमी पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना विशेष उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. व्ही. के. मिनी यांनी स्पष्ट केले की, पावसावर अवलंबून असलेल्या भागांना याचा सर्वाधिक फटका बसेल. सामान्यपेक्षा कमी पावसामुळे जमिनीतील ओलावा कमी होत आहे आणि खरीप पिकांच्या पेरणीला विलंब होत आहे.
एल निनोचा हवामानावर काय परिणाम होतो?
साधारणपणे, जून महिन्यात बंगालच्या उपसागरावर दोन आणि जास्तीत जास्त पाच कमी दाबाच्या पट्ट्या तयार होतात, यामुळे मान्सूनचे वारे अधिक तीव्र होतात. यामुळे देशाच्या मोठ्या भागात चांगला पाऊस पडतो, पण या वर्षी जून महिन्यात बंगालच्या उपसागरावर एकही कमी दाबाचा पट्टा तयार झाला नाही. केरळमध्ये साधारणपणे जून आणि जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्येकी दोन आणि सप्टेंबरमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो. पण, एल निनोमुळे, या प्रणाली तयार होण्याची शक्यता कमी असू शकते.