पार्थ पवारांसोबत चर्चेनंतर सुनील टिंगरेंची माघार; राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे अधिकृत उमेदवार
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण आयात उमेदवार काकडे यांना विरोध झाला. त्यामुळे माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. काकडे आणि टिंगरे या दोघांनी पक्षाने ‘एबी फॉर्म’ दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार कोण? याचा सस्पेन्स कायम राहिला होता. कालच्या या सर्व घडामोडीनंतर टिंगरेंना पार्थ पवार यांनी जिजाई बंगल्यावर बोलावून समजूत काढली. व त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. अखेर टिंगरे यांनी माघार घेतली आहे.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीत अखेर जागावाटप निश्चित झाले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पुणे आणि रायगड हे दोन महत्त्वाचे मतदारसंघ आले आहेत. पुण्यात मात्र उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस पाहायला मिळत आहे. पुणे मतदारसंघासाठी रविवारी रात्री राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयात तब्बल पाच तास बैठक चालली. या बैठकीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र आणि खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय विक्रम काकडे यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, या निर्णयामुळे दिलीप मोहिते, रमेश थोरात, विलास लांडे आणि सुनील टिंगरे यांसारख्या निष्ठावंत इच्छुकांना डावलण्यात आले. या निर्णयावर पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तीला थेट उमेदवारी का, असा संतप्त सवाल कार्यकत्यांनी उपस्थित केला.