बारामतीत एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार
बारामती : नीरा डावा कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने आणि उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने बारामती नगर परिषदेकडून पाणीपुरवठ्याचे नवीन नियोजन जाहीर करण्यात आले आहे. गुरुवार (दि. १८ जून) पर्यंत बारामती शहर, जळोची, रुई, तांदुळवाडी व ग्रामीण भागात नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यानंतर पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, पाटस रिंगरोड येथील जलशुद्धीकरण केंद्रातून होणाऱ्या पुरवठ्याअंतर्गत शुक्रवार (दि. १९ जून) रोजी म्हाडा कॉलनी, समर्थनगर, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, एस.टी. स्टँड परिसर, जवाहरनगर, साईगणेशनगर, अशोकनगर, आनंदनगर, वसंतनगर, अवधूतनगर, ख्रिश्चन कॉलनी, महादेव मळा, पतंगशाहनगर, क्षत्रियनगर, तांदुळवाडी वेस चौक, सुभाष चौक आदी भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शनिवार (दि. २० जून) रोजी कसबा, फलटण रोड, रेणुकानगर, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड परिसर, शिवाजीनगर, कारभारीनगर, सावतामाळीनगर, श्रीरामनगर, पंचशीलनगर, साठेनगर, जगताप मळा तसेच जुना व नवीन मोरगाव रोड परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
सायली हिल व जळोची जलशुद्धीकरण केंद्रांतून होणाऱ्या पुरवठ्यानुसार शुक्रवार (दि. १९ जून) रोजी रुई गाव, डेरेवस्ती, सायली हिल, सूर्यनगरी, देसाई इस्टेट, अंबिकानगर, जळोची गावठाण, बावळे वस्ती, तान्हाई नगर, महिला सोसायटी व प्रगतीनगर येथे पाणीपुरवठा बंद राहील. तर शनिवार (दि. २० जून) रोजी तांदुळवाडी गावठाण, सहयोग सोसायटी, निरा कॅनॉल सोसायटी आणि दूधसंघ सोसायटी परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
नीरा डावा कालव्यातील प्रवाह पूर्ववत सुरू होईपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा व नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.