‘खासदारांबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका’; 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश

‘खासदारांबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका’; 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश

 

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात उद्धवसेनेचे काही खासदार असल्याच्या चर्चेमुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असा स्पष्ट संदेश मातोश्रीवर आयोजित बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांना दिला.

ईशान्य मुंबईतील शाखाप्रमुख, पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर पार पडली. यावेळी ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणी, बीएलए नियुक्ती तसेच एसआयआरसंदर्भातील आढावा घेतला. ईशान्य मुंबईचे खा. संजय दिना पाटील यांच्यासह सर्व खासदार सोबत आहेत. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. काहीजण कामानिमित्त दिल्लीला गेले असले तरी ते सोबतच आहेत. तसेच आगामी पक्षाच्या वर्धापन दिनास जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

तसेच खासदारांबाबतच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. संघटना मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर संपर्क वाढविणे, कार्यकर्त्यांशी संवाद ठेवणे. आगामी कार्यक्रमांच्या नियोजनावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे समजते.