ऑपरेशन टायगर! १६ जूनच्या मध्यरात्री काय काय घडलं?; एकनाथ शिंदेंच्या प्लॅनिंगची संपूर्ण माहिती

ऑपरेशन टायगर! १६ जूनच्या मध्यरात्री काय काय घडलं?; एकनाथ शिंदेंच्या प्लॅनिंगची संपूर्ण माहिती

 


मुंबई: गेल्या ४८ तासांमध्ये मुंबई, नांदेड, दिल्ली इथं घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंचे ६ खासदार फुटल्याच्या दाव्याला बळ मिळाले आहे. व्हिप जारी करूनही पक्षाच्या बैठकीकडे ठाकरेंच्या ६ खासदारांनी पाठ फिरवली. या खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी होण्याच्या प्रस्तातावर सही केल्याची माहिती आहे. त्याआधी या ६ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गट बनवण्यासाठी पत्र दिले होते. १६ जूनच्या मध्यरात्री ६ खासदार वेगवेगळ्या मार्गाने सीक्रेट बैठकीसाठी दिल्लीत पोहचले. या खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी असल्याने आम्ही वेगळा मार्ग निवडला असा दावा बंडखोर खासदारांचा आहे. सध्या हे खासदार कुठे आहेत याची कुणाला कल्पना नाही.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात करण्यात येणारे ऑपरेशन टायगर हे खूप काळ सीक्रेट ठेवले होते. सूत्रांनुसार, या बंडखोरीची पटकथा कित्येक महिने लिहून ठेवली होती. १९ जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनाची वाट पाहिली जात होती. मागील १ वर्षापासून एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे महायुतीतील नाराजी म्हणून पाहिले जात होते. परंतु हा दौरा उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याचा एक भाग होता. प्रत्येक दौऱ्यात शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत होते. १६ जूनच्या मध्यरात्री हा ऑपरेशन टायगर अंमलात आणण्याचं ठरवले. याबाबत उद्धव ठाकरे यांना कुणकुण लागली होती. त्यामुळे १४ जूनला त्यांनी खासदारांची बैठक बोलावली. परंतु या बैठकीला ५ खासदारांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांना बळ मिळाले.

वेगवेगळ्या मार्गाने खासदार दिल्लीत पोहचले

१६ जूनच्या मध्यरात्री १.३० च्या सुमारास सर्वात आधी खासदार नागेश पाटील आष्टीकर प्रायव्हेट जेटने दिल्लीत पोहचले. संजय देशमुख, संजय जाधव यांच्यासाठी नांदेडमध्ये खासगी विमान उभे होते. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिल्लीला जाण्यासाठी हैदराबादचा मार्ग निवडला. त्यानंतर संजय दीना पाटील हे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत दिल्लीत पोहचले. ठाकरेंचे बंडखोर खासदार पोहचेपर्यंत पहाटे ४.३० वाजता एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे दिल्लीत दाखल झाले. सर्वात शेवटी पुण्याहून ओमराजे निंबाळकर दिल्लीत आले. श्रीकांत शिंदे यांनी सर्व बंडखोर खासदारांच्या राहण्याची व्यवस्था नोएडा येथील हॉटेलला केली होती. 

ठाकरेंचे नेते लोकसभा अध्यक्षांना भेटले

रातोरात घडलेल्या घडामोडीमुळे दिल्लीत हालचालींना वेग आला. संजय राऊत यांच्यासह गटनेते अरविंद सावंत, मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्षांच्या भेटीची वेळ मागितली. त्यानंतर पक्षाने व्हिप जारी करत १८ जूनला तातडीने संसदीय पक्षाची बैठक बोलावली. १७ जूनला जेव्हा संजय राऊत दिल्लीत आले तेव्हा बंडखोर गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. उद्धवसेनेचे पत्र सार्वजनिक होण्याआधी सकाळी १०.३० वाजता ५ बंडखोर खासदारांची अध्यक्षांची भेट घेत त्यांचे पत्र सोपवले.

उद्धव ठाकरेंवर आरोप, पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा दावा

दरम्यान, लोकसभा अध्यक्षांना सोपवलेल्या पत्रात ठाकरेंच्या ६ बंडखोरांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. त्याशिवाय सभागृहात आमच्या बैठकीची व्यवस्था बदलण्याची मागणी केली. पक्षाचे नेतृत्व आपल्या विचारधारेपासून भरकटत आहे. वरिष्ठ नेते उद्धवसेनेला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी करत आहेत. हे आम्हाला मान्य नाही असं बंडखोर खासदारांनी म्हटलं. १९ जूनला शिवसेना स्थापना दिवशी सर्व बंडखोर खासदार शिंदेसेनेत प्रवेश करतील. २० जूनला ते माध्यमांसमोर येतील आणि लोकसभा अध्यक्षांना दिलेले पत्र सार्वजनिक करतील. सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्राच्या डीजीपींना निर्देश देत सहा खासदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत.