१५ राज्यांत १० तासांचा अलर्ट, वादळी वारे-मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी वाढेल?

१५ राज्यांत १० तासांचा अलर्ट, वादळी वारे-मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी वाढेल?

 


मुंबई: मान्सून हळूहळू देशातील इतर राज्यांकडे सरकत आहे. परंतु, महाराष्ट्रासह काही भागात एल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. एल निनोमुळे पावसाची आगेकूच थांबल्याचे चित्र आहे. यामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली असून, पाण्याची टंचाई निर्माण होण्याची अनेक ठिकाणी स्थिती आहे. 

हवामान विभागाने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह १५ राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. राजधानी दिल्लीसोबतच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सून आता एकाच जागेवर खिळला

सोलापूर आणि तळकोकणात दिमाखात एन्ट्री केलेला मान्सून आता एकाच जागेवर खिळला आहे. आता थेट जूनच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजेच एकादशी आणि वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरच मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढचे सात ते आठ दिवस संपूर्ण महाराष्ट्राला उकाडा आणि पावसाची चातकासारखी वाट पाहावी लागणार आहे. सध्याच्या स्थितीवरून मान्सूनला मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सक्रिय होण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागेल. २३ जूननंतरच वातावरणात काही अंशी पूरक बदल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, १९ जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहील. मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये हवामान दमट राहणार असून, दिवसा उन्हाचे चटके आणि रात्रीचा उकाडा नागरिकांना बेजार करेल. बंगालच्या उपसागरातून येणारी मान्सूनची दुसरी शाखा गेल्या आठवड्यात गतीने पुढे सरकली होती. मात्र, सध्या पूरक प्रणाली नसल्यामुळे ही शाखाही काहीशी थंडावली असून तिचा वेग मंदावला आहे.