गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा असेल तर पुणेकरांच्या मनात भीती का? सुप्रिया सुळेंचे पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे प्रत्युत्तर
पुणे : गुन्हे कमी झाल्याचे कागदोपत्री दिसत असले, तरी नागरिकांना ते वास्तव वाटत नाही. ‘आकडेवारी आणि जनतेचा अनुभव यांच्यात एवढी तफावत का?’ असा थेट सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. आकडेवारीत घट दिसत असताना नागरिकांच्या मनातील भीती मात्र वाढत असल्याचे नमूद करत सुळे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा करणारे पत्र सुळे यांना पाठविले होते. या पत्राला सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा पोलिस आयुक्तांकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली 'गुन्हेगारीची कीड' अधिकच फोफावत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुळे यांनी आपल्या पत्रात महाराष्ट्र पोलिस दलाबद्दल आदर व्यक्त केला असून, पोलिसांच्या कामगिरीवर टीका करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, पुणे शहरात सातत्याने घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुन्हेगारीच्या घटनांची संख्या हा एक निकष असला, तरी त्यातील क्रौर्य, उघडपणे होणारे हल्ले आणि वाढती दहशत याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
म्हाळुंगे येथील बालकाच्या हत्येपासून ते हडपसरमध्ये सापडलेल्या बॉम्बसदृश वस्तूपर्यंत अनेक घटनांचा उल्लेख करत सुळे यांनी शहरातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. नांदे गावातील भरदिवसा झालेली कोयत्यांची दहशत, दिवे घाटातील टोळक्यांचा हैदोस, रिक्षाचालकावर झालेला प्राणघातक हल्ला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि दिवसाढवळ्या झालेले खून या घटनांनी पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.
शहरात जमावबंदीचे आदेश लागू करावे लागत असताना गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचा दावा कसा करता येईल, असा प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केला. तसेच ‘शहराविषयी नकारात्मक नरेटिव्ह तयार केला जात आहे’ या पोलिस आयुक्तांच्या विधानावरही त्यांनी आक्षेप घेतला. जर कोणी हेतुपुरस्सर चुकीचे चित्र उभे करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का केली जात नाही, याकडेही सुळे यांनी लक्ष वेधले आहे.
गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा असेल, तर पुणेकरांच्या मनात भीतीचे वातावरण का?, गुन्हे नियंत्रणात असताना शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्याची गरज का भासली?, शहराविषयी चुकीचा 'नरेटिव्ह' तयार होत असेल, तर संबंधितांवर कारवाई का नाही?, गुन्हा घडल्यानंतरच्या कारवाईपेक्षा गुन्हा रोखण्यासाठी पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती वाढणार कधी? असे थेट प्रश्नही त्यांनी आयुक्तांना विचारले आहेत.