उद्धवसेनेच्या आमदारांमधील वाद चव्हाट्यावर; भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात 'धुसफूस'
शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार भास्कर जाधव उद्धवसेनेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी बाहेर गर्दीत ते माध्यमांच्या कॅमेरासमोर प्रतिक्रिया देताना, मागून मिलिंद नार्वेकर यांची कार आली. कारला वाट करून देत असताना, भास्कर जाधवांनी नार्वेकरांबाबत "नार्वेकर कोण लागून गेला" असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या वक्तव्यातून भास्कर जाधवांची धुसफूस स्पष्टपणे दिसून आली. याच व्हिडीओवरून मिलिंद नार्वेकरांनी एक्स पोस्ट केली.
भास्कर जाधव यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद द्यावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. या पदाच्या नियुक्तीवरून उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे भास्कर जाधव यांच्या नावाची अधिकृत शिफारस केली आहे. तसेच, ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनाही यासंदर्भात पत्र लिहिले असल्याचे म्हटले जाते. याचाच संदर्भ देऊन मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधवांवर टीका केली आहे. "धुसफूस (Frustration), माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे!" अशी एक्स पोस्ट मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे.
नुकताच सहा खासदारांच्या बंडखोरीचा धक्का बसलेला असताना, आता पक्षांतर्गत आमदारांमधील धुसफूस उद्धव ठाकरे कशापद्धतीने हाताळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.