लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र? मंत्री आदिती तटकरेंनी अखेर मौन सोडले, सांगितले नेमके कारण!

लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र? मंत्री आदिती तटकरेंनी अखेर मौन सोडले, सांगितले नेमके कारण!

 

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांची ई-केवायसी झाल्यानंतर जवळपास ८१ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. ई-केवायसीनंतर या योजनेत १ कोटी ६६ लाख बहिणी अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. यावरून राज्यात गदारोळ निर्माण झाला आहे. दरम्यान, यावरून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिकेत तटकरे यांनी विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

आठ ते दहा महिने केवायसीसाठी दिले

आदिती तटकरे यांना आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ८१ लाख अर्ज बाद झाल्याबाबत विचारण्यात आलं. त्या म्हणाल्या, अर्ज बाद झालेले नाहीत. याजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया गेल्यावर्षी ऑगस्टपासून सुरू झाली. केवायसी पूर्ण करण्याकरता सुरुवातीला तीन महिन्याचा कालावधी दिला. त्यानंतर दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे एकूण आठ-दहा महिन्यांची वाढ झाली होती.”

कोणत्या निकषांवर अपात्र ठरवले?

“ई केवायसी फक्त लाडकी बहीण योजनेत नाहीय. तर, राज्याच्या ज्या ज्या डीबीटी योजना आहेत, त्या सर्वांना ई केवायसीची प्रक्रिया केली जाते. ८१ लाख आकड्यात फक्त ई-केवायसीच्या महिला नाहीत. तर, मुदतीत ई केवायसी न केलेल्या महिलाही आहेत. तसंच, गेल्या दहा महिन्यांपासून आयकर विभागाकडून डेटा मागवलेला होता. ज्यांचं उत्पन्न २ लाखांपेक्षा जास्त आहे, अशा जवळपास १२ लाख महिलांचाही या ८१ लाख अपात्र महिलांमध्ये समावेश आहे. तर, ६५ वर्षांवरील साडेचार लाख महिलांचा समावेश आहे. १४ हजार महिला या सरकारी कर्मचारी होत्या, त्यामुळे त्यांनाही वगळण्यात आलं आहे”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, ई-केवायसी करूनही ज्या महिलांना लाभ मिळणे झाला आहे, त्यांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. कारण, कोणीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये. या छाननीमधून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनाही वगळण्यात आलं आहे. कारण, दोन्हीपैकी एकाच शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. तर, ज्यांच्या नावावर वाहन आहे, त्यांनाही या योजनेतून वगळलं आहे. पण त्यातीलही काही लाभार्थ्यांनी वाहन नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांचीही फेरतपासणी होणार आहे.”