माळेगाव साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन २०० रुपये कांडेबिल जाहीर

माळेगाव साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन २०० रुपये कांडेबिल जाहीर


माळेगांव: राज्यातील अग्रगण्य सहकारी साखर कारखान्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपास आलेल्या सभासदांच्या उसाला प्रतिमेट्रिक टन २०० रुपये कांडेबिल देण्याची घोषणा कारखान्याच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपाध्यक्षा संगिता कोकरे यांनी केली.

कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी (६ जून) पार पडली. या बैठकीत परंपरेनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली. ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर पुढील लागवडीसाठी जमिनीची मशागत करणे, तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविणे यासाठी ही रक्कम शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असल्याचे मत कारखाना प्रशासनाने व्यक्त केले आहे.

या निर्णयासाठी कारखान्याने सुमारे १५ कोटी ३५ लाख ४४ हजार ८६० रुपयांची तरतूद केली आहे. मागील गाळप हंगामात कारखान्याने ७ लाख ६७ हजार ७४७.३०० मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. तर आजपर्यंत कारखान्याने एकूण १० कोटी ६९ लाख ६३ हजार ३५७ मेट्रिक टनांहून अधिक ऊसाचे गाळप केल्याची नोंद आहे.

विशेष म्हणजे, शासनाने जाहीर केलेली एफआरपी रक्कम ३,२६९ रुपये प्रतिटन असतानाही माळेगाव कारखान्याने सभासदांना ३,३०० रुपये प्रतिटन इतकी पूर्ण एफआरपी अदा केली आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांना अद्याप संपूर्ण एफआरपी देणे शक्य झाले नसताना माळेगाव कारखान्याने वेळेवर देयके अदा करून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

साखर उद्योग सध्या विविध आर्थिक अडचणींना सामोरे जात असतानाही सभासदांच्या हिताला प्राधान्य देत कोंडे पेमेंट जाहीर करणारा माळेगाव हा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.कारखाना प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी लागवड हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

याच बैठकीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कारखान्याच्या वतीने शेतकरी सभासदांना विविध फळझाडांची रोपे वाटप करण्याचा निर्णयही घेण्यात आला.यामध्ये आंबा, नारळ, काजू, चिंच, जांभूळ, दालचिनी, सुपारी आदी झाडांच्या रोपांचा समावेश आहे. मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी या उपक्रमाची माहिती देताना पर्यावरण संवर्धनासाठी सभासदांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन केले.

या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कारखान्याच्या उपाध्यक्षा संगिताताई कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, शिवराज जाधवराव, राजेंद्र बुरुंगले, तानाजी कोकरे, योगेश जगताप, स्वप्नील जगताप, गणपतराव खलाटे, विजय तावरे, प्रताप आटोळे, सतीश फाळके, अविनाश देवकाते, जयपाल देवकाते, देविदास गावडे, नितीन सातव, रत्नकुमार भोसले, ज्योती मुलमुले, नितीन शेंडे, विलास देवकाते, दत्तात्रय येळे, रामदास आटोळे, विशाल जगताप, इतर सर्व संचालक, कामगार संचालक चंद्रशेखर जगताप यांच्यासह बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, रूग्णमित्र अविनाश गोफणे, कार्यकारी संचालक अशोक पाटील तसेच सभासद, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.