रांजणगावात लॉजिंगवर पोलिसांची धाड; देहव्यापाराचा पर्दाफाश, सात महिलांची सुटका

रांजणगावात लॉजिंगवर पोलिसांची धाड; देहव्यापाराचा पर्दाफाश, सात महिलांची सुटका

 

रांजणगाव: एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत एका लॉजिंगमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सात महिलांची सुटका करण्यात आली असून, दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिनांक २ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पुणे-नगर हायवेवरील कारेगाव येथील ‘जयश्री फर्निचर’च्या बाजूला असलेल्या एका लॉजिंगवर ही धाड टाकण्यात आली. पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

आरोपींची माहिती:या प्रकरणी लुत्फकर मुज्जमलहक शेख (वय ४५, रा. कारेगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) आणि बबलू साहु (रा. कारेगाव, मूळ रा. ओडिशा) या दोन आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी महिलांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांना लैंगिक शोषणासाठी जबरदस्ती करत होते. लुत्फकर शेख याला अटक करण्यात आली असून, बबलू साहु हा फरार आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बबलू साहु याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारे देहव्यापार चालवल्याप्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.

बांगलादेशी महिलांचा समावेश:

सुटका करण्यात आलेल्या सात महिलांपैकी तीन महिला या बांगलादेशातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पीडित महिलांना सुरक्षेच्या कारणास्तव पुणे येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. बांगलादेशी महिलांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मायदेशी पाठवण्याची (डिपॉर्ट) कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, संदीप गिल्ल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग, प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.