धमकीच्या ई-मेलने सुरक्षा यंत्रणा अलर्ट; मुख्यमंत्री कार्यालय, संघ मुख्यालय टार्गेटवर; मुंबई, पुणे, नागपुरात सुरक्षा यंत्रणा सतर्क

धमकीच्या ई-मेलने सुरक्षा यंत्रणा अलर्ट; मुख्यमंत्री कार्यालय, संघ मुख्यालय टार्गेटवर; मुंबई, पुणे, नागपुरात सुरक्षा यंत्रणा सतर्क

 


मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालय, नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय तसेच मुंबई आणि पुणे महापौर कार्यालयांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या देणारे ई-मेल बुधवारी प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. अनेक ठिकाणी इमारती रिकाम्या करण्यात आल्या. बॉम्बशोधक आणि नाशक पथकांकडून सखोल तपासणी मोहीम राबविण्यात आली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांना आलेल्या ई-मेलमध्ये महाल परिसरातील आरएसएस मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे स्फोटके ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. धमकी मिळताच बॉम्बशोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. परंतु, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

मुंबईतील महत्त्वाची कार्यालये टार्गेटवर
मुंबई महापालिकेला मिळालेल्या ई-मेलमध्ये मुंबईतील अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. यामध्ये महापौर कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, बीएसई भवन आणि पालिकेच्या विविध कार्यालयांचा उल्लेख होता. हे ई-मेल महापालिकेच्या अनेक अधिकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले होते. दरम्यान, अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.

पुणे महापालिका कार्यालय रिकामे - 
पुणे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीला व महापौर कार्यालयालाही धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली. 

‘खलिस्तान नॅशनल आर्मी’च्या नावाने ई-मेल -
‘खलिस्तान नॅशनल आर्मी’ म्हणवणाऱ्या गटाच्या नावाने हे ई-मेल पाठविल्याचा दावा आहे. या ई-मेलमध्ये १९८४ मधील ऑपरेशन ब्लू स्टार आणि ऑपरेशन वुडरोज यांचा उल्लेख होता. तसेच ‘बदला’ घेण्याची भाषा वापरत भाजप व आरएसएसबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता.