माहिती अधिकाराच्या आडून २० लाखांची मागणी; बारामतीतील धक्कादायक प्रकार उघड; गुन्हा दाखल
बारामती: माहितीचा अधिकार (RTI) हा शासन व्यवस्थेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी प्रदान करण्यात आलेला प्रभावी लोकशाही अधिकार आहे. मात्र, या अधिकाराचा वापर सार्वजनिक हिताऐवजी दबाव तंत्र, बदनामी किंवा आर्थिक लाभ मिळविण्यासाठीच होत असल्याचं समोर आलं आहे. एका ग्रामपंचायत सदस्याचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्याने चक्क २० लाखांची मागणी केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गोपाळकृष्ण हरिभाऊ हरीहर (रा. गुणवडी, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीच्या तक्रारीनुसार, हरीहर याने ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात विविध शासकीय कार्यालयांकडे अर्ज, तक्रारी व पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर त्या प्रक्रियेचा आधार घेत फिर्यादीवर दबाव निर्माण करण्यात आला, त्यांची बदनामी करण्याची भीती दाखविण्यात आली, सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याच्या स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्या आणि आर्थिक मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपीकडून शासकीय कार्यालयातील प्रलंबित कार्यवाही, गावातील सामाजिक वातावरण आणि फिर्यादीच्या सार्वजनिक पदाचा संदर्भ देत त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. माणसातून उठवू, तोंड दाखवायला जागा राहणार नाही, गावातून बाहेर काढू अशा स्वरूपाचे कथित संभाषण आणि त्याचबरोबर आर्थिक मागणी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
दरम्यान, तपासादरम्यान इलेक्ट्रॉनिक पुरावे, व्हिडीओ रेकॉर्डिंग, ट्रान्सक्रिप्ट, फॉरेन्सिक प्रमाणपत्रे, साक्षीदारांचे जबाब तसेच इतर उपलब्ध कागदपत्रांच्या प्राथमिक पडताळणीत फिर्यादीकडून २० लाख रुपयांची आर्थिक मागणी करण्यात आल्याचे दर्शविणारी सामग्री उपलब्ध झालेली आहे. उपलब्ध डिजिटल पुराव्यांमध्ये संबंधित संभाषणाचे ध्वनीचित्रण, त्यावरील फॉरेन्सिक परीक्षण अहवाल, ट्रान्सक्रिप्ट तसेच साक्षीदारांनी दिलेली माहिती यांचा समावेश आहे.
या सर्व बाबींची वैज्ञानिक, तांत्रिक व कायदेशीर पडताळणी सुरू असून त्यासंदर्भात पुढील तपास प्रगतीपथावर आहे. उपलब्ध पुरावे, फॉरेन्सिक अहवाल, साक्षीदारांचे जबाब, इलेक्ट्रॉनिक डेटा व इतर कागदपत्रांच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात आरोपी व्यतिरिक्त इतर काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणी हरीहर याच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३०८(३), ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल असून पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे हे अधिक तपास करत आहेत.