“प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तातडीने आवश्यक सर्व मदत करावी” : सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत आढावा घेतला. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित भागातील नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवा. गावातील संपर्क तुटल्यास युद्धपातळीवर उपाययोजना करुन पूर्वरत करावे.मानवी जीविताचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य मानून प्रत्येक निर्णय घ्यावा.नियंत्रण कक्ष 24x7 पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावा व प्रत्येक तासाला परिस्थितीचा आढावा घ्यावा. धोकादायक भागातील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करून सुरक्षित निवारा, अन्न, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात. पूर, भूस्खलन आणि धरण विसर्गाबाबत वेळेवर इशारे एसएमएस, सोशल मीडिया, ग्रामपंचायत व स्थानिक यंत्रणेमार्फत द्यावेत. कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालय सोडणार नाही. सर्व यंत्रणा सतत सज्ज ठेवाव्यात. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल आणि महसूल यांच्यात समन्वय ठेवून तातडीने बचावकार्य करावे, असे निर्देश दिले.
शासनाच्या नियमांनुसार तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी
बंद रस्ते, पूल आणि घाटांवर कडक बंदोबस्त ठेवून नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखावे.अफवांवर नियंत्रण ठेवून अधिकृत माहितीच प्रसारित करावी.मृत्यू, जखमी आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमांनुसार तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या. जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने पाण्याच्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे, नदीवरील पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी नदीपात्राजवळ जाऊ नये किंवा पात्रात उतरू नये, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले आहे.
कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही
वीज, पाणी, आरोग्य आणि दळणवळण सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागांनी युद्धपातळीवर काम करावे. प्रत्येक दोन तासांनी परिस्थितीचा अद्ययावत अहवाल शासनाला सादर करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संवेदनशील भागांवर सतत देखरेख ठेवून आवश्यक ते निर्णय तातडीने घ्यावेत; कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. वारकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी. वयोवृद्ध महिला लहान मुले ही सुद्धा वारीमध्ये येणार आहेत त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी, माहिती तंत्रज्ञान पार्क (आयटी), औद्योगिक परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबत पोलिसांनी दक्षता घ्यावी, अशाही सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने समन्वय साधून काम करावे, नागरिकांनीही प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संकटाच्या काळात एकजूटीने काम करुया आणि नैसर्गिक संकटावर मात करु या, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेला केले आहे.