कराड दक्षिण मतदारसंघात ५६ हजार दुबार मतदार, सखोल चौकशी करा : पृथ्वीराज चव्हाण
गुरुवार, ३० जुलै, २०२६
Edit
सातारा: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये ५६ हजारांवर दुबार, स्थलांतरित आणि संशयित मतदार नोंदी आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आलेली आहे. न्यायालयातही याचिका दाखल आहेन्यायालयासमोर. याबाबत निवडणूक आयोगाने सखोल चाैकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा २०२४ विधानसभा निवडणुकीतील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
सातारा जिल्हा काॅंग्रेस कमिटीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिल्ली येथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधला. त्यानंतर काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष
नामदेवराव पाटील यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी काॅंग्रेसचे
प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, काॅंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सुषमा
राजेघोरपडे, बाबासाहेब कदम आदी उपस्थित होते. दरम्यान, यासंदर्भातील निवेदन
काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना सादर
केले आहे.
जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वीही
पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळोवेळी लेखी स्वरूपात दुबार मतदारांची माहिती
निवडणूक प्रशासनाकडे सादर केली होती. मात्र, त्यावर अपेक्षित कार्यवाही न
झाल्याने हा प्रश्न अद्याप कायम आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या
संगणकीय विश्लेषणानुसार कराड दक्षिण
विधानसभा मतदारसंघातील २१ हजार १३२ मतदारांची नावे तब्बल ४८ हजार ७४१ वेळा
नोंद झालेली आढळून आली आहेत. त्यामुळे सुमारे २७ हजार ६०९ दुबार नोंदी
असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय कराड दक्षिणला
लागून असलेल्या कराड उत्तर, इस्लामपूर, शिराळा, पाटण आणि पलूस-कडेगाव या
पाच विधानसभा मतदारसंघांतील २८ हजार ५०९ मतदारांची नावे कराड दक्षिण मतदार
यादीतही नोंद झाल्याचा संशय आहे. या सर्वांची पडताळणी होणे आवश्यक आहे.
राज्यात
सध्या एसआयआर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील सर्व
दुबार, स्थलांतरित आणि संशयित नोंदींची सखोल पडताळणी करून नियमबाह्य व
अपात्र नावे नव्या मतदार यादीतून वगळण्याची हीच योग्य वेळ आहे. यासाठी
तातडीने कार्यवाही करावी. मतदार यादीची अचूकता, पारदर्शकता आणि
त्रुटीरहितपणा हा मुक्त, निष्पक्ष व विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेचा
मूलभूत आधार आहे. यासाठी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन
तातडीने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, असेही अध्यक्ष पाटील यांनी
स्पष्ट केले आहे.