बारामती फायर एनओसी प्रकरणात मोठी कारवाई; अग्निशमन विभागप्रमुखांना आरोपपत्र, विभागीय चौकशीचे आदेश

बारामती फायर एनओसी प्रकरणात मोठी कारवाई; अग्निशमन विभागप्रमुखांना आरोपपत्र, विभागीय चौकशीचे आदेश

 

बारामती: बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागातील कथित फायर एनओसी गैरव्यवहार प्रकरणात विभागप्रमुख पद्मनाभ सुधीर कुल्लरवार यांच्याविरोधात महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. त्यांना आरोपपत्र बजावण्यात आले असून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

बारामती नगरपरिषद यांचे कोणतेही नियंत्रण येथील मुख्याधिकारी यांचे नसल्याचे या प्रकरणात समोर आले आहे. फायर एनओसी देताना कथित अनियमितता, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करता परवानग्या देणे, माहिती अधिकारांतर्गत मागविलेली माहिती वेळेत न देणे तसेच वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या सर्व आरोपांबाबत त्यांच्याकडून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे.

आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, बारामतीतील काही खासगी कोचिंग क्लासेस व अकॅडमींना फायर एनओसी देण्याच्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विविध स्तरांवर चौकशी झाल्यानंतर शासनाने विभागीय कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद यांची सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी अहवाल ३० दिवसांत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांना आरोपपत्र मिळाल्यानंतर नियमानुसार त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सध्या ही प्रक्रिया सुरू असून आरोप सिद्ध झालेले नाहीत.

चौकशीच्या निष्कर्षानंतर पुढील शिस्तभंगाची कारवाई अथवा अन्य निर्णय होणार हे मात्र समोर आले आहे.

बारामती नगरपरिषदेच्या इतिहासात असा कोणताही गैरव्यवहार घडला नव्हता, मात्र फायर एनओसी गैरव्यवहार प्रकरण त्यामध्ये सवर्गातील अधिकाऱ्यांना मुख्याधिकारी यांनी झुकते माप देत असल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची माहिती काही अधिकाऱ्यानी चर्चा दरम्यान उघड केले आहे.