सुनेत्रा पवार, पार्थ-जय यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची ५ तास बैठक; नेमकं काय शिजतंय?

सुनेत्रा पवार, पार्थ-जय यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची ५ तास बैठक; नेमकं काय शिजतंय?

 


मुंबई: बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवणारे जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी प्रशांत किशोर दाखल झाले होते. जवळपास ५ तास सुनेत्रा पवार आणि इतर नेत्यांसोबत प्रशांत किशोर यांची बैठक चालली. या बैठकीत नेमकी काय रणनीती आखली हे अद्याप समोर आले नाही. परंतु या भेटीतून अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची दुसरी भेट आहे. याआधी प्रशांत किशोर यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा बांकीपूर पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर ही भेट झाली आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. आता सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे यापुढच्या काळात राष्ट्रवादीचे काम पीके हे सांभाळणार असल्याचं सांगितले जाते.

मे महिन्यात खासदार पार्थ पवार यांनी मुंबईत सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक नियोजित केली होती. ज्यावर भाजपाने जाहीर नाराजी व्यक्त केली. या बैठकीवर दोन्ही बाजूने अधिकृत काही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. परंतु प्रशांत किशोर यांची निवडणूक कॅम्पेन कंपनी राष्ट्रवादीसोबत काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या हाती राष्ट्रवादीची कमान आली. मध्यंतरीच्या काळात पक्षातील काही वाद अप्रत्यक्षपणे समोर आले होते. ज्यात निवडणूक आयोगाला लिहिलेले पत्रही गाजले होते. या एकंदर परिस्थितीत पक्षाची रणनीती आखण्यासाठी प्रशांत किशोर यांची मदत घेतली जात आहे. गुरुवारी या दोन्ही नेत्यांमध्ये ३ महिन्यात दुसरी बैठक पार पडली. 

दरम्यान, या बैठकीत पार्थ पवारांसह जय पवारही ऑनलाईन उपस्थित होते. आतापर्यंत एकूण ४ बैठका प्रशांत किशोर यांच्यासोबत झाल्या आहेत. आधीच्या बैठकीत काही बदल प्रशांत किशोर यांनी सुचवले होते. त्यानुसार भविष्यात राष्ट्रवादीत काही फेरबदल झाल्याचं पाहायला मिळू शकते.