दीडशे पाकिस्तानी वधू  लग्नासाठी भारतात दाखल ; तीनशे तरूणी प्रतिक्षेत; व्हिसा बंधनही ठरू शकले नाही लग्नात अडसर

दीडशे पाकिस्तानी वधू लग्नासाठी भारतात दाखल ; तीनशे तरूणी प्रतिक्षेत; व्हिसा बंधनही ठरू शकले नाही लग्नात अडसर

 

नागपूर: पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कुटुंबीयांना भारतात येऊन आपल्या मुलींचे विवाह करणे सोपे जावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून वाघा-अटारी सीमेवरून विनासायास व्हिसा आणि प्रवासाची सुविधा उपलब्ध होती. मात्र, भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून सिंधी प्रवाशांसाठी व्हिसा आणि सीमा मार्ग बंद केल्यानंतर या स्थितीत बदल झाला. व्हिसाच्या बंधनामुळे आपल्या संसाराचे काय होणार या चिंतेने १५० पाकिस्तानी महिलांसमोर अंधारच होता. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आणि त्या लग्नबंधनात अडकल्या.

      ​नागपूरचे सिंधी समुदाय नेते राजेश झांबिया यांनी रविवारी सांगितले की, अनेक प्रयत्नांनंतर केंद्र सरकारने एप्रिलपासून या सिंधी महिलांना आणि त्यांच्या नातेवाईकांना विवाहासाठी भारतात येण्यासाठी व्हिसा मंजूर केला आहे. पाकिस्तानातून आलेल्या सिंधी स्थलांतरितांसाठी काम करणारे झांबिया पीटीआयशी बोलताना म्हणाले की, या वधू आणि त्यांचे कुटुंबीय मस्कत, दुबई, श्रीलंका आणि इतर देशांमधील ट्रान्झिट मार्गाचा वापर करून भारतात पोहोचले आहेत.

     ​त्यांनी सांगितले की, सिंधी समुदायाचे लोक अशा विवाहांसाठी पंजाबमधील वाघा-अटारी सीमेवरून भारतात येत असत.ते म्हणाले,परंतु, ''ऑपरेशन सिंदूर'' नंतर सर्व कांही बदलले.कारण सरकारने अटारी मार्गाने देशात येण्याची योजना आखलेल्या सर्वांचे व्हिसा अर्ज फेटाळून लावले होते.

     ​झांबिया यांनी सांगितले की, आम्ही रायपूर येथील 'शादानी दरबार'चे (पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील घोटकी येथील एक प्रमुख हिंदू धार्मिक स्थळ) आध्यात्मिक प्रमुख संत युधिष्ठिरलाल शादानी यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, शादानी समाजाने भारतातील पुरूषांशी साखरपुडा झालेल्या पाकिस्तानी महिलांची यादी तयार करण्यास सुरूवात केली.ते म्हणाले,नागपूर, रायपूर,जोधपूर,पुणे आणि भारतातील इतर शहरांमध्ये विवाह होणाऱ्या सुमारे १५० वधू होत्या.

      ​या मंदिराने ही यादी केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवून संपर्क साधला.या वधूंना व त्यांच्या कुटुंबीयांना भारतात प्रवास करता यावा यासाठी व्हिसा सुलभ करून देण्याची विनंती केली. गृह मंत्राल्याने त्यांना केवळ विमान प्रवासाने येण्याच्या अटीवर भारतात प्रवेशास मंजुरी दिली,असे त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, या वर्षाच्या एप्रिलपासून विवाहासाठी पाकिस्तान मधील १५० वधू आणि त्यांचे कुटुंबीय दुबई,ओमान, श्रीलंका,बांगला देश आणि इतर देशांमार्गे भारतात आले. यामध्ये नागपूरमधील १५ प्रकरणांचा समावेश आहे.

      ​झांबिया यांनी सांगितले की,पाकिस्तानमध्ये अशा आणखी सुमारे ३०० महिला प्रतीक्षेत असून त्यांनीही आम्हाला व्हिसा मिळावा यासाठी भारत सरकारकडे विनंती केली आहे.