खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण केलं, इतरांसाठी ठरली प्रेरणा; पण पतीच्या छळाला कंटाळून बारामतीच्या विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
बारामती तालुक्यातील करंजे येथील संगीता राजेंद्र काळे ऊर्फ संगीता किरण भोसले वय ३१, हिने पतीच्या वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत मुंबई-डोंबवली येथील विष्णुनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे. विष्णुनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात महिलेच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता राजेंद्र काळे ऊर्फ संगीता किरण भोसले (वय ३१) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सुपे येथे तिचे सासर तर करंजे येथे माहेर आहे. सध्या त्या डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात राहत होत्या. त्यांचे पती किरण भानुदास भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.