महापौरपदावरून भाजप-शिंदेसेनेत जुंपली, वादात उद्धवसेनेचीही उडी

महापौरपदावरून भाजप-शिंदेसेनेत जुंपली, वादात उद्धवसेनेचीही उडी

 

मुंबई : महापौरपदावरून महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेमध्ये जुंपली असून, या वादात आता उद्धवसेनेनेही उडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईचे महापौरपद पुढील सव्वा वर्षासाठी शिंदेसेनेला मिळणार असल्याचे सांगितल्यानंतर भाजपकडून या दाव्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली तर शिंदेसेनेकडून ‘ज्यांना या विषयाची माहिती नसेल त्यांनी बोलू नये,’ असा टोला लगावला. दरम्यान, उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी महापौरपद ‘खरेदी’ करण्याचा आरोप शिंदेसेनेवर केला. 

एकनाथ शिंदे यांच्याकडून महापौरपदावरून ठरलेल्या फॉर्म्युलाची माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली. यावरून भाजपचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी महापौरपदाबाबत अधिकृत निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. “सव्वा वर्षासाठी किंवा सव्वा-सव्वा महिन्यासाठी महापौर कोण होईल, याबाबत  अधिकृत निर्णय  झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.

शिंदेसेनेचा भाजपला टोला
या भूमिकेला शिंदेसेनेचे महापालिकेतील गटनेते अमेय घोले यांनी प्रत्युत्तर दिले. सुमारे सहा महिन्यांपूर्वीच वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत महापौरपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचा दावा त्यांनी केला. 

पुढील अडीच वर्षांच्या कालावधीत सव्वा वर्ष शिंदेसेनेचा आणि त्यानंतर सव्वा वर्ष भाजपचा महापौर राहील, अशी चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली होती, असे घोले यांनी स्पष्ट केले. या बैठकीची माहिती नवनाथ बन यांना नसल्याने त्यांनी यावर बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. 

महापौरपद किती खोक्यांना ?
संजय राऊत यांनी शिंदेसेनेवर  टीका केली. “महापौरपद किती खोक्यांना विकत घेतले, याची माहिती घेत आहे,” असा आरोप करत त्यांनी सव्वाशे कोटी की सव्वा हजार कोटी मोजले, याचा तपास सुरू असल्याचे म्हटले. त्यामुळे महापौरपदाच्या दाव्यावरून महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले.