शिल्पा गवारे मृत्यूप्रकारणी कठोर कारवाई करा; सुषमा अंधारे यांची मागणी

शिल्पा गवारे मृत्यूप्रकारणी कठोर कारवाई करा; सुषमा अंधारे यांची मागणी

 

पिंपरी : वाकड येथील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणी, उद्धव सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी (दि. २९) पीडित कुटुंबीयांची, त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

वैष्णवी प्रकरणानंतर तरी समाजातील सुशिक्षित कुटुंबांचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पुन्हा एका विवाहितेचा जीव जाणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. लग्नाच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अशा घटनांमधील दोषींना कोणतीही सूट मिळता कामा नये, असे अंधारे म्हणाल्या.

गुन्हेगार कितीही प्रभावशाली असला किंवा त्याचे सत्ताधाऱ्यांशी संबंध असले, तरी राजकीय संबंध म्हणजे कुणाचा जीव घेण्याचा परवाना नाही. अशा आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांच्या सामाजिक व नैतिक भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी टीका त्यांनी केली. अशा संवेदनशील प्रकरणात बाजू मांडणाऱ्या वकिलांनी केवळ व्यावसायिकतेचा विचार न करता नैतिकता आणि सामाजिक बांधिलकीचे भान ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सरकार केवळ स्वतःची पाठ थोपटून घेत आहे...

दरम्यान, सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला जात असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला. सारथी, बार्टी आणि महाज्योतीसारख्या संस्थांचा निधी वळवून सरकार केवळ स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. हा सामाजिक विकास नसून पगारी मतदार तयार करण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.