भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे बाजू मांडणार
अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती. या खटल्यासाठी सरकारने अॅड. निकम यांची विशेष सरकारी तकील म्हणून जून महिन्यात नियुक्ती केली होती. मात्र त्यांच्याकडे राज्यातील इतर महत्त्वाच्या खटल्यांची जबाबदारी असल्याने अशोक खरात प्रकरणात ते पहिल्यांदाच सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी नाशिकमध्ये आले आहेत.
तपास यंत्रणेकडून पुरावे व साक्षीदारांची माहितीही संकलित करण्यात आली आहे. खरात प्रकरणात नियमित सुनावणी सुरू झाली आहे. सरकार पक्षाकडून या प्रकरणातील आरोपांचे गांभीर्य, तपासाची सद्यस्थिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे जामीन अर्जाला विरोध केला जाण्याची शक्यता आहे. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम स्वतः सरकार पक्षाची बाजू मांडणार असल्याने या खटल्यातील सुनावणीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोमवारच्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय जामीन अर्जाबाबत काय निर्णय घेते, याकडे पीडितांसह नाशिककरांचे लक्ष लागले आहे. नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून अशोक खरात विरोधात एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १२ गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) आहे.