गडचिरोलीत आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तिघींची मृत्युशी झुंज सुरू; खाटा नसल्याने झोपवले होते जमिनीवर

गडचिरोलीत आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तिघींची मृत्युशी झुंज सुरू; खाटा नसल्याने झोपवले होते जमिनीवर

 

गडचिरोली: जागतिक आदिवासी दिनाचा आनंदोत्सव सुरू असतानाच धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत अत्यंत संतापजनक व काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आदिवासी दिनाच्या रात्री साधारणतः अडीच वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना विषारी साप चावल्यामुळे तीन चिमुरड्या विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेत आणखी तीन मुलींची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या अनास्थेमुळे आणि वसतिगृहातील ढिसाळ कारभारामुळे आदिवासी लेकरांचा बळी गेल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

मयत विद्यार्थिनींची नावे काय?

जपतलाई ​येथे कुप्पा लिंगो शैक्षणिक व संस्कृती विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात ही घटना घडली. ​सुश्मिता सरोजित मंडल (वय १४), दीपिका एतवा लकडा (वय १२), अनु गजुराम कोरेटी (वय ८) अशी मृत विद्यार्थिनींची नावे आहेत. ​दीपिका बिटलूरसाय मडावी (वय ११), ​समृद्धी सुरेश नैताम (वय १४), ​कविता राजकुमार किरंगा (वय १२) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 ​प्रशासनाचा गंभीर हलगर्जीपणा समोर

​सूत्रांच्या माहितीनुसार, या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पलंग उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी मुलींना नेहमीप्रमाणे खाली जमिनीवर गादीवर झोपावे लागले. या अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी घटनेच्या वेळी वसतिगृहाची महिला अधीक्षक गैरहजर होत्या.

​आझाद समाज पार्टीचा तीव्र रोष; निलंबनाची मागणी

​या घटनेनंतर 'आझाद समाज पार्टी'ने आक्रमक भूमिका घेतली असून, प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी प्रशासनाला धारेवर धरत गंभीर आरोप केले आहेत.

​"संस्थापक आणि प्रकल्प अधिकारी एसीमध्ये बसून झोपतात; मात्र आदिवासी आश्रम शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. जर अशा हलगर्जीपणामुळे निष्पाप मुलींचे प्राण जात असतील, तर संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी राज बन्सोड यांनी केली आहे.

​तसेच, नैतिक जबाबदारी स्वीकारून विश्वजित कोवासे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद भूषविण्यापेक्षा आपल्या पदाचा राजीनामा देऊन आधी स्वतःची शाळा व वसतिगृह सुरळीत चालवावे, अशी टीका त्यांनी केली.