राज्य सरकारचा मसुदा मनोज जरांगे यांनी फेटाळला, उपोषणावर ठाम; मुंबईला जाण्याचा निर्धार कायम

राज्य सरकारचा मसुदा मनोज जरांगे यांनी फेटाळला, उपोषणावर ठाम; मुंबईला जाण्याचा निर्धार कायम

 

वडीगोद्री (जि.जालना): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेला १२ मुद्द्यांचा मसुदा फेटाळून लावला. उपोषण सोडणार नसून १२ सप्टेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा त्यांनी पुन्हा दिला. 

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रपरिषदेत सांगितले की, सरकार दोन पावले पुढे आले आहे. आंदोलकांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी. जरांगे पाटील यांनी मसुद्याला प्रतिसाद द्यावा.

प्रकृती खालावण्याची वाट सरकार पाहत आहे का?
मसुदा वाचला का, तो मान्य आहे का, असे प्रश्न वारंवार विचारले जात असल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. प्रकृती आणखी खालावण्याची वाट राज्य सरकार पाहत आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला.

जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद अन् भाषेची चर्चा?
मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी संवाद साधताना जरांगे यांनी वापरलेल्या भाषेबद्दल चर्चा होत आहे. यासंदर्भात जरांगे म्हणाले की, मी त्यांना काही बोललो नाही. तरीही मी चर्चेला तयार आहे. परंतु, चांगल्या चांगल्या मंत्र्यांना फाशी घ्यायची वेळ आली आहे. त्यावेळी मित्तल म्हणाल्या, नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरी चालेल. मी माझे काम करीत आहे. त्यावर जरांगे म्हणाले, फाशी घ्यायचे हे शब्द तुमचे नसतात. मी तुम्हाला घरच्यासारखे ताई म्हणून बोलतोय. हे तुमचे कामच नाही.