धक्कादायक! मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकाचा मृत्यू

धक्कादायक! मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकाचा मृत्यू

 


वडीगोद्री (जालना) : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत आलेल्या एका मराठा आंदोलकाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. दशरथ रायकर (रा. संगम, जि. बीड) असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.  हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

रायकर हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत आले होते. बुधवारी रात्री उशिरा ते परिसरातील एका शेतात  असलेल्या पार्किंगमध्ये झोपले होते. गुरुवारी सकाळी बराच वेळ झाला तरी ते झोपेतून उठत नसल्याचे सहकाऱ्यांच्या निदर्शनास आलं.

उपस्थितांनी त्यानंतर त्यांना तातडीने अंबड येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे हलवण्यात आला. या घटनेमुळे अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.