डीजे मुक्त गणेशोत्सवाची गरज..! शरद पवारांची स्पष्ट भूमिका; सोलापूरच्या निर्णयाचा दिला दाखला
शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६
Edit
पुणे : सार्वजनिक उत्सवांमधील डीजे आणि लाऊडस्पीकरच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर मुलाखतीदरम्यान झालेल्या हल्ल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. “मत व्यक्त करणे म्हणजे हल्ला करण्याचे कारण होऊ शकत नाही. अशा प्रकारची घटना म्हणजे लोकशाहीवर हल्ला करण्यासारखे आहे,” अशी भूमिका पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना मांडली.
बापट
यांच्यावर हल्ला झाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव
घेतली. या प्रकरणात संतोष चव्हाण (रा. राऊतवाडी, कोथरूड) याला पोलिसांनी
ताब्यात घेत अटक केली. या घटनेबाबत बोलताना शरद पवार यांनी, “विद्यानंद बापट यांना मी वैयक्तिकरित्या ओळखत नाही. मात्र, ते मांडत असलेली भूमिका योग्य आहे,” असे स्पष्ट केले.
सण आणि उत्सव हे समाजाला आनंद देणारे असावेत, असे सांगत पवार म्हणाले की,
उत्सवांच्या नावाखाली होणारा कर्णकर्कश आवाज आणि त्यातून निर्माण होणारा
त्रास हा गंभीर विषय आहे. एखाद्या व्यक्तीने या प्रश्नावर आपले मत मांडले
म्हणून त्याच्यावर हल्ला करणे योग्य नाही.
बापट यांच्या सुरक्षेची मागणी
विद्यानंद
बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त
आणि राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज
असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. हल्ल्याचा निषेध करणाऱ्यांच्या
भूमिकेशी आपण सहमत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “हे थांबले पाहिजे.
अन्यथा यंत्रणेने सक्तीने कारवाई केली पाहिजे,” असा इशाराही पवार यांनी
दिला.
‘डीजे मुक्त गणेशोत्सवाची गरज’
गणेशोत्सव
आणि डीजेच्या वाढत्या वापराबाबत बोलताना पवार यांनी सोलापूरमध्ये घेण्यात
आलेल्या ‘डीजे मुक्त गणेशोत्सवा’च्या निर्णयाचा संदर्भ दिला. अशा प्रकारचा
निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्सवांचा आनंद,
सामाजिक सलोखा आणि नागरिकांना होणारा त्रास यामध्ये समतोल राखणे गरजेचे
असून, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने हाताळण्याची आवश्यकता
असल्याचे पवार यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले.